तीन तालुक्यासह वीस मंडलात अतिवृष्टी, कोयना, चांदोलीतून पाणी सोडले, 350 घरांची पडझड, 40 रस्ते पाण्याखाली, वाहतूक बंद, जनजीवन विस्कळित
sangli rain news : सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण : जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यांसह वीस मंडलात अतिवृष्टी झाली. जिल्हा आणि ग्रामीण मार्गावरील तब्बल 40 रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे कृष्णा व वारणा नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील 350 हून अधिक घरांची पडझड झाली असून पशुधनाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान सांगली शहरालाही दिवसभर पावसाने झोडपून काढले, असून अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
sangli rain news : सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर शनिवारी मध्यरात्रीपासून वाढला. दिवसभर पावसाची संततधार सुरुच राहिली. जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज या तालुक्यांत अतिवृष्टी झाली. याशिवाय खानापूर तालुक्यातील दोन आणि आटपाडी तालुक्यातील एका मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर आणि जत तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारी बारा वाजेपर्यंत धुव्वांधार पाऊस सुरुच राहिला. त्यानंतरही पावसाचा जोर सुरु राहिल्याने जनजीवन विस्कळित झाले. वीसहून अधिक मंडळात जोरदार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

कोयना व चांदोली धरण क्षेत्रातही मुसळधार पावसामुळे जलाशय भरू लागले आहेत. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी दोन्ही धरणातून शनिवारी विसर्ग सुरु करण्यात आला. कोयना धरणातून 20 हजार 764 क्युसेक आणि चांदोली धरणातून 3 हजार 370 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पातळीत मोठी वाढ होऊ लागली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील 350 घरांची पडझड
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील सुमारे 350 हून अधिक घरांची पडझड झाली असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. अनेक ठिकाणी पशुधनाचे नुकसान झाले असून त्याबाबतची माहिती तालुकास्तरावरुन घेतली जात आहे. नुकसानीचे पंचनामे करुन आणि प्रभावित कुटुबांना शासनाच्या नियमानुसार तातडीची मदत देण्यात यावी, याबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात पाणीपुरवठा, आरोग्य आणि वीजपुरवठ्या परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे.
चाळीस रस्ते पाण्याखाली, वाहतूक बंद
मुसळधार पावसामुळे ओढे, तलाव आणि नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पावसाचा जोर असल्याने पाण्यात वाढ सुरुच राहिली. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील अनेक अंतर्गत रस्ते बंद असून वाहतूक ठप्प झाली आहे. ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्ग 28 तर 12 राज्य मार्ग असे 40 रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. येथील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु करण्यात आली आहे. काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आहे. प्रशासनाने तातडीने पथके पाठवून दुरुस्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सांगली शहरात थैमान
पावसामुळे सांगली शहरासह उपनगरात जोराच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सांगली शहरातील सखल भागात पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर नाल्याचे पाणी आल्याने तळ्याचे स्वरुप आले होते, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. शनिवारी आठवडा बाजार असल्याने भाजीपाला विक्रेत्यांची दाणादाण उडाली. अनेक दुकानांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
प्रशासन सतर्क
जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन व पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आवश्यक असल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी केली जात आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासांतही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान
पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यामुळे द्राक्ष बागांसह खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. ऑक्टोबर छाटणीस पावसाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. याशिवाय डाळींब, ढबू मिरची, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊसाच्या शेतात सर्या भरुन वाहत आहेत. तर सोयाबीन आणि भूईमुग काढणीवर परिणाम झाला. पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने हातातोंडाला आलेले पीक गेल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
कवठेमहांकाळला सर्वाधिक 83.6 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 50.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 83.6 मिलीमीटर पाऊस झाला. मिरज तालुक्यात 68, जत 44.1, खानापूर 59.3, वाळवा 27.8, तासगाव 69.9, शिराळा 20.8, आटपाडी 53.4, पलूस 47.6 कडेगाव 40.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











