satara zp news : सातारा सभापती निवडीत भाजपचीच बाजी; राष्ट्रवादीच्या फुटलेल्या दोघींना संधी : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीप्रमाणेच चार समितींच्या सभापतींची निवडणूकही गाजली. यामध्ये भाजपने राष्ट्रवादीचा आणखी एक सदस्य फोडत बाजी मारली. तसेच स्वत:कडे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) फुटलेल्या दोन सदस्यांना सभापतीपदे देऊन सत्ता काबीज केली. तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून दडपशाही झाल्याचा आरोप करत बहिष्कार घातला. यामुळे सभापतींच्या निवड बिनविरोध पार पडल्या.
satara zp news : सातारा सभापती निवडीत भाजपचीच बाजी; राष्ट्रवादीच्या फुटलेल्या दोघींना संधी
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक 20 मार्च रोजी झाली होती. त्या निवडीवेळी भाजपविरोधात राष्ट्रवादी आणि शिंदेसेना होती. निवडणुकीत राडा झाला होता. भाजपने राष्ट्रवादीचे तीन आणि शिंदेसेनेचे दोन सदस्य फोडत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचीही निवडणूक जिंकली. त्यामुळे प्रथमच सातारा झेडपीवर भाजपच झेंडा फडकला. तसेच आताच्या सभापती निवडणुकीतही भाजपने फोडाफोडी करुन पुन्हा बाजी मारली आहे.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चार समिती सभापतीपदासाठी निवडणूक झाली. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले उपस्थित होते. या सभेसाठी भाजपकडून समाजकल्याण समिती सभापतीसाठी ऋषिकेश धायगुडे-पाटील, महिला व बालकल्याणसाठी ऋतुजा शिंदे आणि इतर दोन समित्यांसाठी तेजस्वीनी कदम आणि लता कर्णे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.
यामधील ऋतुजा शिंदे या राष्ट्रवादीच्या सदस्या असल्यातरी या निवडणुकीत त्या भाजपकडे गेल्या. तर लता कर्णेही राष्ट्रवादीच्या असल्यातरी अध्यक्ष निवडीवेळीच त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिंदेसेना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सदस्य काळ्या फिती लावून आले. लोकशाहीची हत्या झाली असा आरोप करत त्यांनी निवडीवर बहिष्कार घातला. त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगून सभापतींची नावे जाहीर केली. त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
खटाव तालुक्यात तीन पदे; तिघीही महिला
सभापतीची चार पदे होती. यातील दोन पदे ही खटाव तालुक्याला मिळाली आहेत. पुसेसावळी गटातून निवडूण आलेल्या तेजस्वीनी कदम यांना शिक्षण समिती सभापतीपद मिळाले. तर बुध गटातील लता कर्णे यांना कृषी समिती सभापती विराजमान होता आले. तर खटाव गटातून निवडूण आलेल्या डॉ. प्रिया शिंदे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे खटाव तालुक्यात तीन पदे गेली आहेत. यातील दोन कोरेगाव आणि एक कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आहे.
वाई मतदारसंघात दोन सभापतिपदे
वाई विधानसभा मतदारसंघात खंडाळा तालुकाही येतो. या मतदारसंघातील वाई तालुक्याच्या बावधन गटातील ऋतुजा शिंदे यांना महिला व बालकल्याणचे सभापतिपद मिळाले. तर खंडाळ्याच्या खेड बुद्रुक गटातील ऋषिकेश धायगुडे-पाटील यांना समाजकल्याण समितीचे सभापती मिळाले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











