sudhir gadgil news : भविष्यात सुधीरदादांना मोठे पद मिळणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ः आ. गाडगीळ यांचा नागरी सत्कार सोहळा : आमदार सुधीर गाडगीळ हे जातीपातीच्या राजकारणाच्यावर पोहोचलेले नेतृत्व आहे. त्यांनी मागील अनेक वर्षात व्यवसायात जशी विश्वासार्हता कमावली, त्याप्रमाणे राजकारणातील विश्वासार्हता कमावली आहे. त्यामुळे एक वेळ इलेक्टोरल पॉलिटिक्समधून थोडी सवलत देऊ. परंतु राजकारणातून निवृत्तीची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना भविष्यात मोठे पद मिळू शकते, असे सूचक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी सांगलीत केले.
येथील स्टेशन चौकात आ. सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार गाडगीळ व मंजिरी गाडगीळ यांचा सपत्नीक सत्कार पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ. गोपीचंद पडळकर, माजी आ. दिनकर पाटील, पृथ्वीराज पाटील, रावसाहेब पाटील, राजाराम गरुड, पृथ्वीराज पवार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, स्थायी सभापती अतुल माने, गीता पवार, दीपक शिंदे, नीता केळकर, जतचे नगराध्यक्ष रवींद्र आरळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, निवडणूक ही निवडणुकीपूर्ती मर्यादित असते. त्यानंतर सामाजिक कामच केले पाहिजे. या भावनेतून सुधीरदादा नेहमी कार्यरत असतात. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत गाडगीळ हे नाव चालणार का अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र गाडगीळ फॅमिलीने व्यवसायामध्ये मिळवलेली विश्वासार्हता त्यांनी केलेली सामाजिक काम यावर पक्ष नेतृत्वाचा विश्वास होता. त्यामुळे त्यांना 2014 च्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली.
कामाच्या जोरावर ते निवडून आले. त्यानंतर दादांनी विकास कामाचा झपाटा लावला. महापालिकेला शंभर कोटींचा निधी मिळवून दिला. त्यातून रस्त्यांना चांगले दिवस आले, त्याशिवाय विविध विकासकामे केली.
ते पुढे म्हणाले, दादांनी राजकारण पैसा मिळवण्यासाठी केले नाही. उलट खिशातील पैसे टाकून राजकारण केले. 2024 ची निवडणूक तशी अडचणीची होती, पण चांगल्या कामामुळे ते विजयी झाले. माझा मूळ पिंड राजकारणाचा नाही. सामाजिक परंपरा आणि पुण्याई त्यांच्या मागे आहे. दादांना एकवेळ इलेक्टोरल पॉलिटिक्समधून सवलत दिली जाईल. मात्र राजकारणातून निवृत्ती होण्याची परवानगी नाही. राजकारणात त्यांना मोठे पद मिळू शकते. या टर्ममधील अद्याप साडेतीन वर्षे आहेत त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करावीत. सुधीरदादांनी शंभर वर्षे पूर्ण करावेत, अशा शुभेच्छाही यावेळी पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.
यावेळी आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. सांगलीचा महापुरापासून बचाव करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
माझ्या कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणार नाही ः आमदार गाडगीळ
सांगलीकरांनी मला तीनवेळा निवडून दिले. माझ्यावर विश्वास अपार प्रेम दाखवले. त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या विचाराने काम करत आहे. कधी वादात पडलो नाही. कधी टीका केली नाही. काम करत राहिलो. पक्षाच्या आदेशाने तिसर्यांदा निवडणूक लढावी लागली. पक्ष व जनतेचे प्रेम कधीही विसरणार नाही. जे विश्वासाने माझ्यासोबत राहिले काम केले. त्यांना वार्यावर सोडले जाणार नाही. न्याय दिला जाईल, असे आ. गाडगीळ यांनी सांगितले.
ते म्हणाले, हजारो कार्यकर्त्यांचे बळ मिळाले आहे. सांगलीच्या जनतेने व्यवसायात राजकारणात आणि समाजकारणात भरभरून प्रेम दिले. ते विसरू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. विनोद तावडे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी विश्वास दिला. त्यांचे आभारी आहोत. उर्वरित कालावधी अपूर्ण राहिलेले प्रकल्प आणि कामे पूर्ण करू.
महिलांकडून औक्षण अन् संजीवन तुला
अजिंक्यियन फाउंडेशनतर्फे औक्षण करण्यात आले. तसेच भाजपा जैन प्रपोज आणि स्वदेशी फार्मा यांच्यावतीने आमदार सुधीर गाडगीळ यांची औषधांची संजीवन तुला करण्यात आली. तर मीनाक्षी पाटील यांच्यावतीने त्यांचे साखर तुला करण्यात आले. तसेच गीता पवार यांच्या वतीने वही तुला करण्यात आले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











