vice president election : उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?

SHARE:

vice president election : उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत? : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. एनडीएने महाराष्ट्रातील राज्यपाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सी.पी राधाकृष्णन यांना उमेदवार बनवले आहे तर विरोधी पक्षाने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्याने ही निवडणूक रंजक बनली आहे.

vice president election : उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?

या निवडणुकीसाठी लागणारं संख्याबळ पाहिले तर सत्ताधारी पक्षाकडे पारडे झुकल्याचे दिसून येते. सध्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण 782 खासदार या निवडणुकीत मतदान करतील. या निवडणुकीत जिंकण्यासाठी 392 चा बहुमताचा आकडा पार करावा लागेल. लोकसभेत एकूण 543 खासदार आहेत. ज्यात एनडीएकडे 293 आणि विरोधी इंडिया आघाडीकडे 234 खासदार आहेत. इतर छोट्या पक्षांचे 15 सदस्य लोकसभेत आहेत.

राज्यसभेतलं गणित काय?

राज्यसभेत एकूण 240 खासदारांपैकी एनडीएकडे 134 खासदारांचे समर्थन आहे तर विरोधकांकडे 78 खासदार आहेत. याठिकाणी छोटे आणि इतर पक्ष मिळून 28 सदस्य आहेत. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा मिळून सत्ताधारी पक्षाकडे एकूण 427 खासदार आहेत. जे बहुमतापेक्षा 35 मतांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे विरोधकांकडे 312 खासदार आहेत याचा अर्थ बहुमतासाठी 80 मतांची कमी आहे. इतर पक्ष आणि अपक्ष मिळून 43 मते आहेत. मात्र ते वगळले तरीही सत्ताधारी पक्षाचे पारडे जड दिसत आहे.

मागील निवडणुकीवर नजर टाकली तर ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार जगदीप धनखड यांना 528 मते मिळाली होती तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ 182 मते मिळाली होती. त्यावेळी संसदेत 55 खासदारांनी मतदान केले नव्हते. आता एनडीए आणि इंडिया आघाडीचे उमेदवार दोघेही दक्षिण भारतातून येतात. राधाकृष्णन तामिळनाडू तर सुदर्शन रेड्डी तेलंगणातून येतात. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून आणि गोव्यात लोकायुक्त काम केल्याने सुदर्शन रेड्डी यांची प्रतिमा निष्कलंक आहे. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असून ते भाजपाचे जुने नेते आहेत.

दरम्यान, संख्याबळ पाहिले तर सी.पी राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विरोधकांनीही चांगल्या प्रतिमेचे सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरले आहे. परंतु संख्याबळ कमी असल्याने त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. मात्र विरोधकांना अपेक्षा आहे की, एनडीएतील काही घटक पक्षांचे खासदार सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देऊ शकतात. विशेषत: दक्षिण भारतातील पक्ष टीडीपी, वायएसआर काँग्रेसवर लक्ष आहे. जर प्रादेशिक अस्मितेची जोड सुदर्शन रेड्डी यांना मिळाली तर निवडणूक रंजक बनेल. परंतु सध्यातरी याची शक्यता फार कमी दिसत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *