vidhanprishad news : कुणाची माघार, कोण मैदानात आज फैसला

SHARE:

vidhanprishad news : कुणाची माघार, कोण मैदानात आज फैसला : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी गुरुवारी (दि. 4) शेवटची मुदत आहे. या निवडणुकीसाठी 7 अर्ज वैध ठरले आहेत. महायुतीकडून भाजपचे धैर्यशिल कदम यांचा एकमेव अर्ज आहे. तर शिवसेनेचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचा अर्ज आहे. 

vidhanprishad news : कुणाची माघार, कोण मैदानात आज फैसला

तानाजी पाटील, बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष, आज माघारीची मुदत

याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असली पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप यांचा पक्षाकडून अर्ज राहिला आहे, तर बाळासाहेब पाटील यांचा अपक्ष अर्ज राहिला आहे. सेना आणि राष्ट्रवादी पवार पक्षाचे उमेदवारांच्या भूमिकेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी भाजप, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासह अपक्ष अशा आठ उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जांच्या छानणीमध्ये एक अर्ज अवैध ठरला, त्यामुळे सात उमेदवारांचे बारा अर्ज शिल्लक राहिले आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. या निवडणुकीतून कोण माघार घेणार आणि किती जण मैदानात राहणार आहे, हे स्पष्ट होईल. त्यामुळे माघारीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिवसभर राजकीय नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरुच राहिले.

महायुतीकडून भाजपचे अभयसिंह जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. शिवसेनेच्यावतीने तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र छाननीवेळी त्यांच्याकडून ए.बी. फॉर्म दाखल केला नाही. त्यामुळे सेनेच्या पाटील यांचा अर्ज अपक्ष राहिला आहे.

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सेनेचे नेते महायुतीसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत पाटील यांनी भेट घेवून उमेदवारी कायम ठेवण्याची विनंती केली होती. मात्र पाटील यांच्या माघारीसाठी सेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु होते.

साताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी अर्ज माघार घ्यावी, अशी विनंती केल्याचे समजते. परंतु पाटील गुरुवारी उशिरापर्यंत उमेदवारीबाबत काही नेत्यांसोबत बैठकांचे सत्र सुरु होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने अभयसिंह जगताप आणि प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु जगताप यांचा उमेदवारी अर्जाला पक्षाकडून ए.बी. फॉर्म जोडण्यात आला. तर पाटील यांचा अपक्ष अर्ज म्हणून भरण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जगताप हे महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित आहेत. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. काँग्रेसकडून मयूर पाटील आणि संजय मेंढे यांचा अर्ज अपक्ष म्हणून राहिले आहेत.

महायुतीत सेनेकडून तानाजी पाटील यांचा तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांचा अर्ज शिल्लक आहे, त्यामुळे दोन्ही नेते उमेदवारी अर्जाबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *