samdoli news : समडोळीच्या ज्ञानभूमीतून उगवला यशाचा तेजस्वी सूर्य : मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील समृद्धी, संस्कार आणि शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या समडोळी गावाने पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावला आहे. शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या गावातील सुपुत्र संस्कार प्रविणकुमार पाटील (पालगोंडा) याने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड 2026 परीक्षेत देशात 923 वा क्रमांक पटकावत समडोळीच्या नावाला नवा गौरव प्राप्त करून दिला आहे. या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, संस्कारवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
samdoli news : समडोळीच्या ज्ञानभूमीतून उगवला यशाचा तेजस्वी सूर्य
जेईई अॅडव्हान्स्डमध्ये देशात 923 वा क्रमांक; गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
यश हे एका दिवसाचे फळ नसते; त्यामागे अनेक पिढ्यांची मेहनत, संस्कार आणि ज्ञानाची परंपरा दडलेली असते. संस्कार हा येथील ज्येष्ठ नागरिक तथा शिक्षणप्रेमी सुधाकर पालगोंडा यांचा नातू आहे. शिक्षक म्हणून समाजात ज्ञानदानाचे कार्य करताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले.
त्यानंतर भूविकास बँकेत सेवा बजावत त्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला. त्याच ज्ञानपरंपरेचा आणि कर्तृत्वाचा वारसा संस्कारचे वडील प्रा. प्रविणकुमार पाटील यांनीही पुढे चालविला. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या वडिलांकडून मिळालेली प्रेरणा, कुटुंबातील शैक्षणिक वातावरण आणि स्वतःची अथक मेहनत यांच्या बळावर संस्कारने हे यश संपादन केले आहे.
जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षा म्हणजे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि कष्टांचा कस पाहणारी अत्यंत कठीण स्पर्धा. भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IIT) प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी ही परीक्षा देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा म्हणून ओळखली जाते.
जेईई मेन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या परीक्षेसाठी पात्रता मिळते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेचे स्वप्न पाहतात; मात्र यशाच्या शिखरावर पोहोचणारे मोजकेच असतात.
यावर्षी सुमारे 1.8 लाख विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा दिली. त्यापैकी केवळ 56 हजार 880 विद्यार्थी पात्र ठरले. या प्रचंड स्पर्धेत देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये 923 वा क्रमांक मिळविणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि दुर्मीळ कामगिरी मानली जाते.
समडोळी गावाच्या इतिहासात आजवर कोणत्याही विद्यार्थ्याने जेईई अॅडव्हान्स्डमध्ये इतक्या उच्च क्रमांकाने यश मिळविले नव्हते. त्यामुळे संस्कारचे हे यश केवळ वैयक्तिक न राहता संपूर्ण गावाच्या अभिमानाचा विषय बनले आहे.
संस्कारच्या या उज्ज्वल यशाने समडोळीतील विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, हे त्याने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले आहे. त्याच्या यशाने अनेक विद्यार्थ्यांच्या मनात नवी स्वप्ने रुजली असून, गावातील पालक आणि शिक्षकांनाही प्रेरणेचा नवा स्रोत मिळाला आहे.
आज समडोळी गाव अभिमानाने सांगत आहे की, आपल्या मातीतून एक असा हिरा घडला आहे ज्याने राष्ट्रीय स्तरावर गावाचे नाव उजळविले. संस्कारच्या या यशामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, भविष्यात तो आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास प्रत्येक समडोळीकर व्यक्त करत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










