zp election reservation : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी : मागील काही महिन्यांपासून लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अखेर शुक्रवारी जाहीर करण्यात आले. सांगली जिल्हा परिषदेची चावी पुन्हा एकदा महिलेच्या हातात जाणार असून अडीच वर्षासाठी अध्यक्षपद आता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले. याशिवाय दहा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. मिनी मंत्रालयाच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आता जिल्हा परिषद गटाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरु होणार असल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
zp election reservation : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी
दहा पंचायत समित्यांसाठी आरक्षण निश्चित
ग्रामविकास विभागाकडून शुक्रवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत निर्णय घेतला. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले. अध्यक्षपदाच्या सोडतीची घोषणा झाल्याने आता लवकरच निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. पुढील अडीच वर्षासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाले आहे. मागील निवडणुकीत शेवटचे अडीच वर्षे महिलेच्या हाती सत्तेची दोरी होती. आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर महिलाराज येणार असल्याने सर्व पक्षांच्या नेत्यांना अध्यक्षपदासाठी उमेदवार डोळ्यासमोर ठेवून उमेदवार उभे करावे लागणार आहेत.
जिल्ह्यात दहाही पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तीन पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. तसेच तर तीन पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीन सभापतीपद आरक्षित आहे, त्यापैकी एक महिलांसाठी आहे. तसेच अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी एक सभापती पद आरक्षित झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत दि. 20 मार्च 2022 रोजी संपली आहे. कोरोना, ओबीसी आरक्षण, पाऊस, अशा विविध कारणामुळे मुदतीत निवडणूक होऊ शकली नव्हती. परिणामी गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीयराज आहे. निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल, याबाबत वेगवेगळी मते व्यक्त होत होत होती. मात्र 14 जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द झाली. त्यानुसार 61 गट आणि 122 गण निश्चित करण्यात आले आहेत. या रचनेमध्ये खानापूर मतदारसंघात एक गट आणि दोन गणांची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना गट आणि गणांच्या सोडतीकडे लक्ष लागून आहे.
मागील दोन टर्मचे अध्यक्ष
2012 ते 2017 या कालावधीत पहिले अडीच वर्षे सर्वसाधारण गटासाठी राखीव होते. त्यावेळी अमरसिंह देशमुख आणि देवराज पाटील अध्यक्ष झाले. तसेच उर्वरित अडीच वर्षे सर्वसाधारण महिलामध्ये रेश्माक्का होर्तीकर व स्नेहल पाटील यांना जबाबदारी देण्यात आली होती. 2017-2022 या कालावधीत पहिले अडीच वर्षे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले होते. जिल्हा परिषदेवर भाजपने सत्ता मिळवली होती. त्यातून संग्रामसिंह देशमुख यांना संधी देण्यात आली होती. तसेच अडीच वर्षे ओबीसी महिलेसाठी राखीव झाले, त्यावेळी प्राजक्ता कोरे यांना संधी मिळाली.
zp-election-reservation-sangli-zilla-parishad-president-post-for-general-women
दिग्गजांच्या सौभाग्यवती अध्यक्षपदाच्या शर्यतीत
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचाली वाढणार आहेत. आमदारांसह दिग्गज नेत्यांच्या सौभाग्यवती मिनी मंत्रालयाचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी स्पर्धेत राहणार आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण अद्याप निघालेले नाही. गटाचे आरक्षण निघताच दावेदारी निश्चित होण्याचे संकेत आहेत.
थ्
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











