bajar samiti news : बाजार समिती सभापतीपद शरद पवार राष्ट्रवादीकडे आनंदराव नलवडे, महेश पवार यांच्यात रस्सीखेच : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर गुरुवारी निवड करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत हे पद काँग्रेसकडे होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार आहे. त्यामुळे या पक्षाचे नवे सभापती आनंदराव नलवडे की महेश पवार होणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान सभापती पदासाठी इच्छुक असलेल्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.
bajar samiti news : बाजार समिती सभापतीपद शरद पवार राष्ट्रवादीकडे आनंदराव नलवडे, महेश पवार यांच्यात रस्सीखेच
सांगली बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे जास्त संचालक असल्याने पावणेतीन वर्षांपूर्वी सुजय शिंदे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. काही संचालकांच्या म्हणण्यानुसार सभापतीपद हे सव्वा वर्षासाठी ठरले होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊन नवीन संचालकांना सभापती पदावर संधी देण्यात यावी, अशी मागणी होत होती. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी त्यामध्ये बदल केला नव्हता.
जिल्हा परिषदेच्या कसबे डिग्रज गटातून आनंदराव नलवडे यांच्या चिरंजीवांनी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सभापती बदलाबाबत घडामोडी घडल्या. सभापती शिंदे यांचा राजीनामा खासदार विशाल पाटील यांनी मागून घेतला. त्यानंतर नलवडे यांचा अर्ज निवडणुकीतून काढून घेण्यात आला. त्यामुळे त्याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला.
खासदार पाटील यांच्याकडून नलवडे यांनी हे राजीनामा पत्र घेतले. ते जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण यांच्याकडे सादर केले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी सभापती निवडीचा कार्यक्रम लावला आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी 11 वाजता ही निवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत जत तालुक्याला ही संधी मिळाली आहे. उपसभापती पद कवठेमहांकाळ तालुक्याकडे राहिले. त्यामुळे आता मिरज तालुक्याला सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचा नंबर झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या पदासाठी दावेदारी सांगितली जात आहे. आ. जयंत पाटील, आ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील, माजी आ. अजितराव घोरपडे, माजी आ. विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, संचालक सुरेश पाटील यांना भेटून त्यांनीही संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ते आ. जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील आहेत. त्याशिवाय आता मिरज तालुक्याचा नंबर आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील महेश पवार यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याबाबत जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील म्हणाले, यावेळी कवठेमहांकाळला सभापती पदाची संधी मिळायला हवी. बुधवारी आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. त्याशिवाय मिरज तालुक्यातून संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











