ankali news : अंकली गोळीबारप्रकरणी दोघे जेरबंद : जखमीसह चौघांवर गुन्हा दाखल ;

SHARE:

ankali news : अंकली गोळीबारप्रकरणी दोघे जेरबंद : जखमीसह चौघांवर गुन्हा दाखल ; : मिरज तालुक्यातल्या अंकली फाट्यावर गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांनी ट्रायल घेताना झालेल्या गोळीबारात प्लॉट एजंट अदित्यकुमार अशोक नाईक (वय 30, रा. एकता कॉलनी, सांगली) हा गंभीर झाला. याप्रकरणी पिस्तूल देणार्‍यासह दोघांना ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले.

ankali news : अंकली गोळीबारप्रकरणी दोघे जेरबंद : जखमीसह चौघांवर गुन्हा दाखल ;

पिस्तूल देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार ; ट्रायल घेताना घटना; एक पसार.

समर्थ संजय गायकवाड (वय 22, रा. हाडको कॉलनी, मिरज) व जखमी अदित्यकुमार याचा मित्र शिवतेज सुहास सावंत (30, कर्नाळ) अशी त्या दोघांची नावे आहेत. सुजल भोसले (रा. मिरज) हा पसार आहे. यातील समर्थ गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मोकातून जामिनावर बाहेर आला आहे. पिस्तूल चालू स्थितीत आहे की नाही, याची ट्रायल समर्थ गायकवाड याने घेतली. त्यातून हा गोळीबार झाल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस अंमलदार विष्णू काळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अदित्यकुमार नाईक आणि शिवतेज सावंत हे दोघे मित्र आहे. दोघेही प्लॉट एजंट आहेत. गावठी कट्टा घ्यायचा होता. त्यासाठी त्याने समर्थ गायकवाड याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर काल सायंकाळी पिस्तूल दाखवण्यासाठी समर्थ गायकवाड आणि सुजल भोसले येणार होते. त्यासाठी अदित्यकुमार आणि त्याचा मित्र शिवतेज सावंत हे दोघे चारचाकी (एमएच 10 ईई 0065) मधून आले.

विठ्ठल पाटील कॉलेजसमोरील अंकली फाटा येथे चौघेही पावणे सातच्या सुमारास आले. त्यावेळी समर्थ गायकवाड हा गाडीत बसला. पिस्तूल चालू स्थितीत असल्याची खात्री करून देण्यासाठी पिस्तूल लोड केली. त्यावेळी अचानक त्यातून गोळीबार झाला. त्यातील गोळी अदित्यकुमार याच्या पोटात घुसली. दोन राऊंड फायर झाल्याने खळबळ उडाली.

रक्ताच्या थारोळ्यात अदित्यकुमार याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. अपर अधीक्षक कल्पना बारावकर, उपाधीक्षक संदीप भागवत, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पथक दाखल झाले. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने दोघांना अटक केली. समर्थ गायकवाड याच्याविरोधात आर्म क्ट, चोरी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याच्यावर मोकाची कारवाई करण्यात आली होती. त्यातून तो बाहेर आला होता. त्याने ती पिस्तूल मध्यप्रदेश येथून आणल्याची कबुली दिली आहे. कारवाईत निरीक्षक तळेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, नितीन बाबर, ईस्माल तांबोळी, सहायक फौजदार मेघराज रूपनर, अवधुत भाट, बंडु पवार, अभिजीत पाटील, विष्णू काळे, धीरज यादव, रमेश पाटील, रणजित घार्गे, मनोज निळकंठ, हिंमत शेख, मनोज वाघमोडे, सुनील शिंदे, रोहित साखरे, भारत कुंठे यांचा सहभाग होता.

गाडीच्या सीटमधून घुसली गोळी…

समर्थ गायकवाड बंदूकीची ट्रायल दाखवत होता. त्यावेळी तो चारचाकीत मागे बसला होता. तर जखमी अदित्यकुमार हा चालक जागी बसला होता. दोन राऊंट पिस्तूलमध्ये बसल्यानंतर ट्रीगर न दाबता गोळीबार झाला. सीटमधून घुसून गोळी अदित्यकुमार याला लागली. त्यातून तो जखमी झाला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *