jat news : मोटेवाडीत भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू : जत तालुक्यातील मोटेवाडी (असांगी तुर्क) येथे मंगळवारी मरगुबाई यात्रेदरम्यान वादळी वार्याने चिरावीटाची भिंत कोसळून सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. वादळापासून बचावासाठी घेतलेला आसरा क्षणार्धात मृत्यूचा सापळा ठरल्याने यात्रास्थळी एकच आक्रोश पसरला. या दुर्घटनेत 12 भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जत, उमदी व संख येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
jat news : मोटेवाडीत भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
मरगुबाई यात्रेत भीषण दुर्घटना; जत तालुक्यातील दरीबडची, पांडोझरी व कर्नाटकातील भाविकांचा मृत्यू, 12 जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक
जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिर परिसरात दर मंगळवार व शुक्रवारी मोठी यात्रा भरते. जत पूर्व भागासह कर्नाटकातील डोमनाळ, टकळगी परिसरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
मंगळवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे व पावसाला सुरुवात झाली. वार्याचा वेग वाढताच भाविकांनी मंदिराजवळील पत्र्याच्या शेडखाली आश्रय घेतला. मात्र काही क्षणांतच वादळामुळे सुमारे 140 फूट लांबीच्या शेडचे पत्रे उचकटले गेले आणि त्याचा जोर चिरावीटाने बांधलेल्या भिंतीवर आदळला. क्षणार्धात भिंत कोसळून अनेक भाविक ढिगार्याखाली दबले गेले.
घटना इतकी भीषण होती की, काही क्षण परिसरात धुरळा, किंकाळ्या आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वादळामुळे काहीच सुचेनासे झाले होते. ढिगार्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि भाविकांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले.
मिळेल त्या वाहनांतून जखमींना संख प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी रुग्णालयांत हलविण्यात आले. काही जखमींना पुढील उपचारासाठी जत येथे आणण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच काहींजणां चा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत कोंडीबा राऊबा गेजगे (वय 65, रा. दरीबडची), शंकर आबा लोखंडे (वय 80, रा. पांडोझरी), मंगल भाऊसो मोटे (वय 45, रा. पांडोझरी), अरुण विजू गेजगे (वय 13, रा. डोमनाळ, ता. विजयपूर), सोन्या लक्ष्मण चव्हाण (वय 14, रा. डोमनाळ, ता. विजयपूर) आणि संगीता रामचंद्र चौधरी (वय 40) यांचा मृत्यू झाला.तर जखमींमध्ये अण्णाप्पा रामगोंडा चौधरी (वय26-) दर्याप्पा नागा कोकरे (वय 50), मुरलीधर सुराप्पा पुजारी (वय 54), मरीबा नागा कोकरे (तिघेही रा. पांडोझरी), संजू आप्पासो ऐवळे, शिवा मरीबा गेजगे (रा. डोमनाळ, ता. विजयपूर), धोंडीबा बिरा गेजगे (वय 50), बिरू विजू गेजगे (वय 35), राजू राम चौधरी (वय 30), बसवराज भाऊसो मोटे (वय 30), सुभाष भाऊसो गडदे, शांता राजू लोखंडे आणि उमेश यलापा लोखंडे यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे, प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलीस पाटील आनंदा मोटे, सरपंच कोंडीबा मोटे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले. दरम्यान, वेगवेगळ्या रुग्णालयांत जखमींना दाखल करण्यात आल्याने सुमारे दोन तास मृत आणि जखमींचा नेमका ताळमेळ लागत नव्हता.
या दुर्घटनेनंतर मंदिर परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण जत तालुका हादरला आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घातलेली झडप पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी देवस्थान परिसरातील बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही संबंधित विभागांना तातडीने मदत व बचावकार्य करण्याच्या सूचना दिल्या.
वादळापासून बचावासाठी घेतलेला आसरा ठरला मृत्यूचा सापळा
मोटेवाडी येथील मरगुबाई यात्रेसाठी हजारो भाविक उपस्थित होते. सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वार्यामुळे भाविकांनी देवस्थानलगत उभारलेल्या पत्र्याच्या शेडखाली धाव घेतली. मात्र, काही क्षणांतच जोरदार वार्याने शेडचे पत्रे उडून चिरावीटाच्या भिंतीवर आदळले आणि भिंत थेट भाविकांच्या अंगावर कोसळली. क्षणार्धात यात्रास्थळी किंकाळ्या, धुरळा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ढिगार्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत बचावकार्य केले.
निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह ?
देवस्थान परिसरातील शेड व भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वादळी वार्याचा तडाखा बसताच भिंत कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दुर्घटनेनंतर या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










