vayfle news : वायफळेतील जवान विशाल घोडके कानपूरमध्ये शहीद : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील जवान विशाल सदाशिव घोडके (वय 32) यांचे देशसेवेत असताना शनिवारी आकस्मिक निधन झाले. कानपूर येथे सैन्य दलात सेवा बजावत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे वायफळेसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून घोडके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
vayfle news : वायफळेतील जवान विशाल घोडके कानपूरमध्ये शहीद
विशाल घोडके हे लहानपणापासूनच देशसेवेच्या भावनेने प्रेरित होते. आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी मोठे करावे, सैन्य दलात भरती होऊन देशाचे रक्षण करावे, हे त्यांचे स्वप्न होते. घोडके कुटुंबीयांमध्येच देशसेवेची परंपरा असल्यामुळे त्यांच्यावरही त्याचा मोठा प्रभाव पडला होता. त्यांचे वडील सदाशिव घोडके यांनी अनेक वर्षे सैन्य दलात सेवा बजावत देशसेवा केली होती. तसेच त्यांचे मोठे बंधू विनोद घोडके हेही गेल्या अनेक वर्षांपासून सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यामुळे देशसेवेचे बाळकडू विशाल यांना घरातूनच मिळाले होते.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विशाल यांनी सैन्य दलात भरती होण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. अभ्यासाबरोबरच मैदानावर तासन्तास घाम गाळत त्यांनी शारीरिक तयारी केली. दिवस-रात्र अथक परिश्रम घेत अखेर वयाच्या अवघ्या 18-19 व्या वर्षी त्यांची सैन्य दलात निवड झाली. त्यानंतर तब्बल 13 ते 14 वर्षे त्यांनी देशसेवेत स्वतःला झोकून दिले. सध्या ते कानपूर येथे सैन्य दलाच्या युनिटमध्ये कार्यरत होते.
मात्र, शनिवारी सकाळी काळाने अचानक घाला घातला. देशसेवेचे कर्तव्य बजावत असतानाच त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही बातमी गावात समजताच वायफळे परिसरात शोककळा पसरली. गावातील अनेकांनी घोडके कुटुंबीयांच्या घरी धाव घेत त्यांचे सांत्वन केले. विशाल यांच्या निधनामुळे गावाने एक कर्तव्यदक्ष जवान गमावला असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
विशाल घोडके यांचे पार्थिव सोमवारी सकाळी वायफळे येथे आणण्यात येणार असून त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
घोडके कुटुंबियांची देशसेवेची परंपरा..!
वायफळे येथील घोडके कुटुंबीयांनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले आहे. शहीद विशाल घोडके यांचे वडील सदाशिव घोडके यांनीही सैन्य दलात अनेक वर्षे सेवा बजावत देशसेवा केली आहे. निवृत्तीनंतर ते सध्या गावाकडे शेती करत आहेत. आपल्या मुलांनीही देशसेवा करावी, अशी त्यांची इच्छा होती आणि दोन्ही मुलांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला.
सदाशिव यांची मुले विनोद घोडके आणि विशाल घोडके या दोघांनीही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर सैन्य दलात स्थान मिळवले. दोघेही देशसेवेचे कर्तव्य पार पाडत असताना विशाल यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या वीरमरणामुळे घोडके कुटुंबीयांसह संपूर्ण वायफळे गाव शोकसागरात बुडाले आहे. दरम्यान, शहीद जवान विशाल यांचे चुलते तानाजी हेही सैन्यात होते. तर त्यांचा मुलगाही सध्या सैन्यात देशसेवा करत आहेत. या कुटुंबातील 5 जण देशसेवेत होते. मात्र विशाल यांच्या मृत्यूने देशसेवेची परंपरा जपणार्या या कुटुंबाच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










