खानापूर तालुका सोसायटी गटातून अमोल बाबर यांचा अर्ज दाखल

SHARE:

खानापूर तालुका सोसायटी गटातून अमोल बाबर यांचा अर्ज दाखल

अनिलभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून शेतकर्‍यांसाठी काम करणार

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यातून ‘अ’ गटात शिवसेनेच्या वतीने अमोलदादा बाबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना, स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी तब्बल 20 वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून काम केले. अत्यंत सरळ मार्गाने आणि शेतकर्‍यांना मदत व्हावी, या दृष्टिकोनातून त्यांनी बँकेच्या माध्यमातून काम केले. त्याच पावलावर पाऊल ठेवून शेतकरी आणि सहकार क्षेत्रासाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे अमोलदादा बाबर यांनी सांगितले.
ते म्हणाले जिल्हा बँक ही शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेली महत्त्वाची संस्था आहे. अनिलभाऊंनी संचालक म्हणून काम करताना शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांचा हा कामाचा आदर्श पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असेल.
शिवसेनेच्या उमेदवारीबाबत बोलताना अमोलदादा बाबर म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या वतीने आज चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आणखी काही जण उद्या अर्ज दाखल करतील. मी आणि तानाजी पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अर्ज दाखल केला आहे. आम्ही दोघे निवडून येणार आहोत. त्यानंतर इतर जागांबाबत ज्या काही चर्चा करायच्या असतील, त्या आम्ही करू. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतले जातील असे ही त्यांनी सांगितले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी एकूण 21 जागांवर निवडणूक होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘अ’ गटाला विशेष महत्त्व असून या गटामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, विकास सेवा संस्था, संयुक्त शेती संस्था आणि धान्य बँका आदी सहकारी संस्थांचा समावेश होतो.
आमदार सुहास बाबर म्हणाले, ‘‘काय करायचे, हा निर्णय आम्ही सर्वजण एकत्र बसून घेऊ. आमची अपेक्षा आहे की, आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत. आमच्या नेत्यांशी चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. शिवसेनेची मते पाहिली, तर खानापूर, आटपाडी, वाळवा, मिरज आणि तासगाव या तालुक्यांमध्ये मतांची बेरीज मोठी आहे. त्यामुळे आमचा वाटा आम्ही वाढवून घेणार आहोत. जो सन्मानजनक प्रस्ताव देईल, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. तसेच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *