sangli bank news : जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांना क्लीनचीट

SHARE:

sangli bank news : जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांना क्लीनचीट : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत माजी सांचालकांच्या काळातील 82 कोटी रुपयांचा कथित घोटाळा प्रकरणातून संबधित सर्व आजी-माजी संचालक, तत्कालीन अधिकार्‍यांना क्लिनचीट मिळाली. चौकशी अधिकारी तथा निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांनी चौकशीत संबधितांवर एकही आरोप सिध्द झाला नसल्याचे म्हटले असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 व त्याखालील नियम 72 नुसार प्रस्तुत चौकशी प्रकरण हे सबळ पुराव्याअभावी अंतिमत: रद्द करुन निकाली काढले.

sangli bank news : जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांना क्लीनचीट

82 कोटींच्या थकित घोटाळ्याच्या आरोपातून मुक्त, निवृत्त न्यायाधिशांकडून निकाल, आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत यांना धक्का

या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांच्यासह जिल्हा बॅँकेच्या आजी, माजी संचालकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या दोन वर्षापासून जिल्हा बॅँकेवर याप्रकरणी सतत आरोप करणारे भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत धक्का बसला आहे.

जिल्हा बँकेत मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कारभाराविरोधात शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांच्या तक्रारीवरुन सहकार विभागाने चौकशी सुरु केली. या मागील संचालक मंडळातील काही संचालक पुन्हा निवडून आल्याने याप्रकरणी आजी व माजी संचालक तसेच तत्कालीन अधिकार्‍यांची चौकशी सुरु होती.

चौकशी विरोधात संचालकांनी केलेल्या अपिलावर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी या चौकशीला स्थगिती दिली होती. सदरची स्थगिती उठवावी व दोषींवर कारवाईची मागणी आ. सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळात केल्यानंतर ही चौकशी पुन्हा सुरु झाली. आ. पडळकर व आ. खोत यांनी याप्रकरणी सातत्याने आरोप करून जिल्हा बॅक व संबधितांना टार्गेट केले होते.

चौकशीत प्रथम संबधित संचालक व तत्कालीन, विद्यमान अधिकार्‍यांवर चार प्रकरणात बँकेचे 50 कोटी 58 लाख 87 हजार 880 रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत याची जबाबदारी निश्चित करून वसुली करण्यासाठी कलम 88 अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली. या चौकशीतून अनेक मुद्दे वगळल्याची तक्रार आ. खोत व आ. पडळकर यांनी पुन्हा शासनाकडे केली.

यानंतर शासन आदेशाने चौकशीत नव्याने सहा प्रकरणांचा समावेश करत बँकेचे 31 कोटी 32 लाख 8 हजार 334 रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. यामुळे दहा प्रकरणात बँकेच्या 81 कोटी 90 लाख 96 हजार 214 रुपयांच्या नुकसानप्रकरणी बँकेच्या आजी-माजी संचालक, तत्कालीन व विद्यमान अधिकार्‍यांची चौकशी सुरु होती.

आ. खोत व आ. पडळकर यांच्या मागणीवरुन शासनाने या चौकशीसाठी काही महिन्यांपूर्वी निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांची नियुक्ती केली होती. मखरे यांनी आजी-माजी संचालकांसह 57 जणांवर चौकशीतील दहा पैकी तीन प्रकरणात आरोप ठेवले होते. अन्य सात प्रकरणातील सुमारे 65 कोटींच्या नुकसानीप्रकरणी संबंधितांना मखरे यांनी यापुर्वीच क्लिनचीट दिली आहे.

उर्वरित संगणक खरेदी, फर्निचर व जाहिरातीच्या खर्च या प्रकरणात सुमारे 16 कोटी 59 लाखांचे बँकेचे नुकसानप्रकरणी सुनावणी सुरु होती. ही सुनावणी पूर्ण होऊन निवृत्त न्यायमुर्ती मखरे यांनी अंतिम निकाल दिला. त्यात या सर्वच प्रकरणात आजी व माजी संचालकांना क्लिनचिट देण्यात आली. सदरचे चौकशी प्रकरणच मखरे यांनी अंतिमत: रद्द करुन निकाली काढले.

 

संचालकांची या आरोपातून मुक्तता
– विकास सोसायट्यांसाठी संगणक खरेदी – 14.67 कोटी
– बँकेच्यावतीने दिलेल्या विविध जाहिराती – 1.23 कोटी
– विश्वकर्मा प्लायवूडकडून फर्निचर खरेदी – 69.22 लाख
– बँकेच्या 36 शाखा, मुख्यालयातील फर्निचरचे काम – 14.57 लाख
– तांत्रिक पद भरतीतील कर्मचार्‍यांना नियमबाह्य पगारवाढ – 35.88 लाख
– बाबासाहेब देशमुख सूतगिरणी विक्रीप्रकरण – 28.89 कोटी
– महांकाली, माणगंगा कारखाना विक्री मुद्रांक विभाग दंड – 1.97 कोटी
* सहा संस्थाच्या विक्री प्रकरणात चुकीचा जमा खर्च – 22.42 कोटी
* महांकाली साखर कारखाना साखर विक्रीतील तफावत – 11.51 कोटी
* वसंतदादा कारखाना डिस्टलरी प्रकरण

जिल्हा बँकेवर चौकशीचा 21.57 लाखांचा खर्च

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी शासनाने चौकशी अधिकारी म्हणून निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांची नियुक्ती केली होती. या चौकशीसाठी मखरे यांची चौकशी शुल्क 20 लाख रुपये असून त्यांचा प्रवास भत्ता 1 लाख 57 हजार 500 रुपये आहे. सदरची दोन्ही मिळून 21 लाख 57 हजार 500 रुपयो जिल्हा बॅँकेने द्यावेत, असे आदेश चौकशी अधिकार्‍यांनी दिले आहेत.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *