ankali murdar news : अंकलीत संतप्त ग्रामस्थांनी तरूणाचा मृतदेह ठेवला संशयितांच्या दारात

SHARE:

गावात तणाव पूर्ण शांतता, बंद; पोलिसांच्या मध्यस्तीनंतर अत्यंसंस्कार.

अंकली येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत भोसकल्याने गंभीर जखमी झालेल्या शीतल धनपाल पाटील (वय 25) तरुणाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आज सकाळी गावात आणण्यात आला. त्यावेळी कुटुंबियांसह गावकरी आक्रमक झाले. त्यांनी स्मशानभूमीत नेलेला मृतदेह परत गावात आणून आरोपींच्या दारात ठेवला. जोवर आरोपींची गावातून धिंड काढली जात नाही, तोवर अंत्यसंस्कार होणार नाहीत, अशी भूमिका घेतली.

त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शीतलचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा पाहून गावकर्‍यांना हुदका आवरला नाही. आज अंकली गाव बंद ठेवत निषेध व्यक्त करण्यात आला. काही लोकांमुळे गाव बदनाम होत असून त्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, अशी अग्रही मागणी करण्यात आली. गावात कोठेही कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री अंकली येथील जैन बस्तीजवळ गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. रात्री दहाच्या सुमारास संशयित विकास बंडू घळगे (वय 35) हा मिरवणुकीत घुसून नाचू लागला, तेव्हा मंडळाचे सदस्य सुनील पाटील यांनी त्याला अडवले. ‘तू आमच्या मिरवणुकीत नाचू नकोस,’ असे त्याला सांगितल्यावर त्याने सुनील पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

पाटील यांचा पुतण्या जखमी शीतल हा भांडण सोडवण्यास गेला. त्यावेळी विकासचे साथीदार क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (28), आदित्य शंकर घळगे (22, अंकली) हे दोघे त्याठिकाणी आले. त्यांनी सुनील पाटील यांना मारण्यास सुरूवात केली. यावेळी शीतल हा मध्ये पडला. तेव्हा संशयितांनी चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना काल शीतल याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, शीतल याचा मृतदेह आज गावात आणण्यात आला.

त्यावेळी कुटुंबियांनी हंबरडा फोडला. अख्ख गाव यावेळी एकत्र आले होते. शीतल याचा मृतदेह स्मशनभूमीत नेल्यानंतर गोंधळ झाला. त्यानंतर गावकर्‍यांनी तो मृतदेह पुन्हा गावात आणला. आरोपींच्या घरासमोर ठेवला. यामुळे गावात तणाव निर्माण झाला. पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी आरोपींची दहशत मोडून काढण्यासाठी गावांत धिंड काढा, अशी मागणी करण्यात आली. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगत मध्यस्ती केली. त्यानंतर गावकर्‍यांनी पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यानंतर अत्यसंस्कार करण्यात आला. गाव बंदची हाक यावेळी देण्यात आली होती. शंभर टक्के शुकशुकाट गावात आज होता. ह्रदय पिळवटणार्‍या या घटनेने अख्ख गाव सुन्न होतं.

‘‘स्मशानात नेलेला मृतदेह मारेकर्‍यांच्या घरासमोर ठेवण्याची वेळ अंकलीतील गावकर्‍यांवर आली या सारखे दुर्दैव नाही. गावात सारे समाज गुण्यागोविंदाने राहत असून काही समाजकंटकामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा अंकली ग्रामस्थांकडून तिरस्कार आणि निषेध आहे.’’
– शशिकांत पाटील,
माजी सरपंच, अंकली

‘‘अंकलीत मिरवणूकीदरम्यान तिघांनी शीतल पाटील याचा खून केला. त्यानंतर गावात आज जनशोक उसळला होता. आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली असून त्यांना अधिक शिक्षा व्हावी, असा तपास केला जाईल. सध्यस्थितीत गावात शांततेचे वातावरण आहे.’’
– किरण चौगले,
पोलिस निरीक्षक,
ग्रामीण पोलिस ठाणे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *