ashta election news : आष्ट्यात उमेदवारीसाठी संघर्षाची चिन्हे : 24 जागेसाठी 182 इच्छुकांचे देव पाण्यात आष्टा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 10 अर्ज तर 12 प्रभागातील प्रत्येकी दोन असे 24 नगरसेवक पदासाठी 182 इच्छुकांचे देव पाण्यात आहेत. 2016 नंतर तब्बल 9 वर्षांनी निवडणूक लागल्याने पुढील पाच वर्षांपर्यंत संयम पाळून पुढल्या निवडणुकीत न्याय मिळेल का? आता संयम पाळायचा का? या संभ्रम अवस्थेत इच्छूक आहेत. मागील इतिहास पाहता भविष्यात पाच वर्षात काहीही राजकीय घडामोडी होऊ शकतात.
ashta election news : आष्ट्यात उमेदवारीसाठी संघर्षाची चिन्हे : 24 जागेसाठी 182 इच्छुकांचे देव पाण्यात
त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, पक्ष तर पक्ष नाहीतर अपक्ष, आला तर सोबत नाहीतर तुमच्या शिवाय, आता थांबायचं नाय …आशा पोस्ट सोशल मीडियावर शेअर करीत इच्छुकांनी व त्यांच्या समर्थकांनी इशारावजा आपापले शक्तीबळ दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आष्ट्यात पक्षांतर्गत बंडाळीची चिन्हे वाढली आहे.
21 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने त्या दिवशीच चित्र समोर येईल तोपर्यंत मात्र इच्छुकांची व पक्षप्रमुखांची डोकेदुखी वाढणार आहे हे निश्चित.
आष्टा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज दाखल पात्र अर्जाची स्थिती पाहता व पक्षांचा पसंती ए फॉर्म बी फॉर्म पाहता सर्वच मित्रपक्षात इच्छुकांत नाराजनाट्य पहावयास मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2011 व 2016 चा पालिका निवडणूक इतिहास पाहता अंतर्गत संघर्षातून बंड करून अपक्ष निवडून आलेल्यांचे पुनर्वसन तर झालेच पण पालिकेत महत्वाचे सभापती पद, पक्षातील महत्वाचे पद देत बंडखोरांना जणू बडतीच दिली होती. त्यामुळे काही उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी तिकीट फायनल होण्याआधीच सोशल मीडियावर तर काहींनी प्रत्यक्ष दावेदारीसाठी रान उठवले आहे.
24 जागांसाठी 182 इच्छुक असल्याने मित्रपक्षात वादंग होण्याची, संघर्ष होण्याची व यातून बंडाळी होण्याची दाट शक्यता आहे. एकीची वज्रमुठ करूनही सध्य स्थितीला इच्छुक उमेदवारांचे प्रभागनिहाय अर्ज पाहता महायुतीत बऱ्याच प्रभागात संघर्षाची चिन्हे दाट आहेत.
बंडोबाना कसे करायचे थंड
बंडाळीचे पेव रोखण्यात स्थानिक नेतृत्वाला व वरिष्ठांचा कस पणाला लागणार आहे. यातील यश अपयशावरून बंडोबा थंड होतील का? त्यांना कोणत्या पदाचे जसे स्वीकृत वा स्थानिक पातळीवरील पक्षाचे पद देऊन शांत करायचे यासारखे पर्याय शोधावे लागतील. काहीजण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याची वा विरोधकांशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











