झेडपीसाठी डॉ. शीतल अमोल बाबर रिंगणात तालुक्यातील सर्वच गटांचे विकल्प खुले
babar vita news : जिल्ह्याच्या राजकारणात बाबर बंधूंची मोठी खेळी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यात बाबर बंधूंनी मोठी खेळी केली आहे. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्नुषा जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या पत्नी डॉ. शीतल अमोल बाबर यांना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरविले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. एक प्रज्ञावंत वकील व पीएचडी पदवी संपादन केलेल्या उच्चविद्याविभूषित डॉ. शीतल बाबर या जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहात असणार आहेत.
babar vita news : जिल्ह्याच्या राजकारणात बाबर बंधूंची मोठी खेळी
स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर हे आमदार म्हणून विधिमंडळात कार्यरत होते. त्यांचे एक सुपुत्र सुहास बाबर हे जिल्हा परिषदेत कार्यरत होते. तर दुसरे सुपुत्र अमोल बाबर हे विटा नगरपालिका क्षेत्रात आणि सहकारी संस्थांच्यामध्ये कार्यरत होते. एकाच वेळेस विधिमंडळात जिल्हा परिषदेत आणि नगरपरिषदेत कार्यरत असणार्या या घराण्यात स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर हे आमदार झाले.
विटा नगरपालिकेच्या आगामी येणार्या निवडणुकीची सर्व धुरा अमोल बाबर यांच्यावर असणार आहे. त्याचवेळी सुहास बाबर आमदार झाल्याने आता जिल्हा परिषदेत बाबर कुटुंबातील डॉ. शीतल बाबर एंट्री करणार आहेत. लोकशाहीतल्या या तिन्ही सभागृहावर पकड असेल तर राजकारण मजबुत व भक्कम राहते. कामाचे विभाजन आणि लोकसंपर्क या बाबी सहज शक्य होतात. अशी बाबर समर्थकांची धारणा आहे. गेल्या दहा वर्षात बाबर यांच्याकडून सुरू असलेली ही राजकारणाची पद्धत तशीच पुढे राहणार आहे.
इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेवर प्रभुत्व, उत्तम वक्त्या, लेखिका, विधी शाखेच्या प्राध्यापक, कॉपीराईट लॉ या विषयात पीएचडी मिळविलेल्या डॉ . शीतल बाबर यांनी देश विदेशात अनेक सेमिनारमध्ये सहभाग घेतला आहे. समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा म्हणुन त्यांनी महिला आणि निराधार लोकांसाठी काम केले आहे. प्रत्येक निवडणुकीत त्या महिला आघाडीची धुरा सांभाळतात. त्यांना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवून एक उच्चशिक्षित चेहरा देण्याचा प्रयत्न बाबर यांच्याकडून होत आहे.
डॉ. शीतल बाबर यांच्यासाठी खानापुर तालुक्यातील चारही गटांचे विकल्प खुले आहेत. त्यांचा हक्काचा नागेवाडी गट सर्वसाधारण महिला आहे. तिथे यापुर्वी आमदार सुहास बाबर हे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाले होते. उर्वरित लेंगरे आणि करंजे हे दोन्ही गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असल्याने बाबर यांच्यासाठी या ठिकाणाहून देखिल मागणी होऊ शकते. परंतु सर्वाधिक चर्चेत असणारा भाळवणी गट सर्वसाधारण झाल्याने व इथेही बाबर गट स्ट्राँग असल्याने या गटात उमेदवारावर एकमत न झाल्यास इथे डॉ. शीतल बाबर यांचा पर्याय आहे.
babar-vita-news-babar-brothers-big-move-in-district-politics
सध्यातरी त्यांची भाळवणी गटासाठी कार्यकर्त्यांकडून प्रचंड मागणी होत आहे अर्थात सर्वस्वी आमदार सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर हे अंतिम निर्णय घेणार आहेत. तरी देखिल डॉ. शीतल बाबर या भाळवणी गटातूनच निवडणूक लढवतील असे त्यांचे कार्यकर्ते खात्रीशीर सांगत आहेत. पण यंदा जिल्हा परिषदेत डॉ. शीतल बाबर यांच्या रूपाने एक उच्चविद्याविभूषित चेहरा असणार आहे हे नक्की.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











