samdoli news :समडोळी ग्रामपंचायतीचा नवा संकल्प : मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात यशाची नवी गाथा लिहिण्याचा निर्धार

SHARE:

समडोळी ग्रामपंचायतीचा नवा संकल्प : मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात यशाची नवी गाथा लिहिण्याचा निर्धार  मिरज तालुक्यातील हिरकणीसारखं तेजस्वी नाव कमावलेलं समडोळी हे गाव पुन्हा एकदा राज्याच्या यशदर्शक नकाशावर आपली मोहोर उमटवण्यास सज्ज झालं आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि माझी वसुंधरा अभियानात राज्यस्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमठवणाऱ्या या गावाने आता मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात सहभाग घेऊन या अभियानालाही यशाच्या शिखरावर पोहोचवण्याचा संकल्प केला आहे.

samdoli news :समडोळी ग्रामपंचायतीचा नवा संकल्प : मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात यशाची नवी गाथा लिहिण्याचा निर्धार

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातील बैठकीत, गावाच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला गेला. ग्रामपंचायत सरपंच सुनिता हजारे, उपसरपंच क्रांती पाटील, ग्रामसेवक जेउर, कर्मचाऱ्यांमध्ये चंद्रकांत गर्जे आणि निलेश चव्हाण, तसेच गावातील सर्व मान्यवर नेतेमंडळी आणि सदस्यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी सुरेश पाटील, वैभव पाटील, महावीर चव्हाण, किरण पाटील, अभय पाटील, महाबळ मुंंडे, राजेंद्र पाटील, प्रमोद ढोले, अमजद फकीर, पिंटू मसाले यांसारखे गावप्रेमी उपस्थित होते.

या बैठकीत केवळ निर्णय झाला नाही, तर एक दृढ संकल्प उभा राहिला — गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शासनाच्या उपक्रमांना जनतेच्या सहभागातून यश देण्यासाठी समडोळी पुन्हा एकदा पुढे सरसावणार आहे.

गेल्यावर्षी ‘माझी वसुंधरा’ या अभियानात समडोळीने राज्यात उल्लेखनीय स्थान मिळवत ७५ लाख रुपयांचं बक्षीस मिळवलं. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत गरजांमध्ये केलेल्या कामामुळे हे यश गावाला प्राप्त झालं. धर्म, जातीपातीच्या सीमा ओलांडून गावकरी गुण्यागोविंदानं एकत्र राहत आहेत, याचं हे फलित आहे. विविध सहकारी संस्था, सामाजिक संघटना, तरुणाईचा उत्साह आणि ग्रामस्थांचा प्रामाणिक सहभाग यामुळे हे सर्व शक्य झालं आहे.

आता मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून समडोळी आपली ग्रामराज्य निर्मितीची परंपरा पुढे नेत आहे. हे अभियान केवळ योजना नव्हे, तर गावाच्या आत्म्याशी एकरूप झालेला एक सामाजिक आणि आध्यात्मिक प्रवास ठरणार आहे. गावाच्या मातीशी नाळ जुळवणारे प्रत्येकजण आता यशाचं नवं पर्व लिहिण्याच्या तयारीत आहेत.

समडोळी पुन्हा सज्ज… यशाच्या नव्या झेंड्यांसाठी!

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *