चंद्रकांतदादा पाटील ः महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करणार
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप ताकदीने उतरणार असून सत्ताधार्यांच्या विरोधात पॅनेल उभारण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या हालचालींना वेग आला आहे.
कोल्हापूर येथे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी बैठक झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, राहुल महाडीक, चिमण डांगे, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, अमरसिंह देशमुख, वैभव पाटील आणि भाजप नेते शेखर इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक तयारी आणि विविध मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा झाली. पालकमंत्री पाटील यांनी भाजपने निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरावे, अशी भूमिका मांडली. विकास सेवा संस्था गटासह अन्य मतदारसंघांमध्येही निवडणुकीची तयारी सुरू करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकार्यांना दिल्या.
महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून निवडणुकीचे स्वरूप आणि जागावाटप निश्चित केले जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड आणि पॅनेलची अंतिम रचना केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे भाजप स्वतंत्रपणे पॅनेल उभारणार की महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार, याबाबतचा अंतिम निर्णय चर्चेनंतर होणार आहे.
जिल्हा बँकेच्या 21 संचालकपदांसाठी निवडणूक होणार असून अंतिम मतदार यादीत 2 हजार 445 मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
घटक पक्षांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र महायुतीतील घटक पक्षांशी दोन-तीन दिवसांत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे भाजप स्वतंत्रपणे पॅनेल उभारणार की महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार, याबाबतचा अंतिम निर्णय चर्चेनंतर होणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











