लाडांच्या बालेकिल्यात मुश्रीफांची एन्ट्री

SHARE:

लाडांच्या बालेकिल्यात मुश्रीफांची एन्ट्री

पलूसमध्ये पदवीधरच्या उमेदवारीसाठी भैय्या मानेंसाठी बैठक

पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ थेट शरद लाड यांच्या बालेकिल्यात बैठक घेवून भैय्या माने यांच्यासाठी बैठक घेतली. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने पदवीधर उमेदवार प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांच्या उमेदवारीसाठी जोरदार आग्रह धरला असून, महायुतीतील मित्रपक्षाने संबंधित जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी, असे आवाहन त्यांनी केले. माने यांचे चार-पाच जिल्ह्यांमध्ये चांगले संपर्क असून, त्यांच्या व्यापक जनसंपर्काचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
पलूस येथील संग्राम भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने आयोजित पदाधिकारी मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी पदवीधर उमेदवार प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, पलूस-कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश भैय्या येसुगडे, तालुकाध्यक्ष सारंग माने, दिलीप जाधव, कपिल गायकवाड, अजित जाधव, जय भवानी उद्योग समूहाचे संस्थापक प्रकाश पाटील, नगरसेवक धनाजी कुंभार, अशोक मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात महायुतीची युती आहे. त्यामुळे विधानपरिषदेची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पक्षाने प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांच्या रूपाने सक्षम उमेदवार दिला आहे. त्यांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे.
विधानपरिषद निवडणुकीत यावेळी मतदारांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचून पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचे आवाहनही त्यांनी केले.
येत्या 27 सप्टेंबर रोजी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होणार असून, नव्या उत्साहाने पक्षाची संघटनात्मक वाटचाल पुढे नेण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीच्या विधानपरिषद निवडणुकांचा संदर्भ देताना मुश्रीफ यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी झालेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीत मात्र सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करून पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे त्यांनी सांगितले.
गावागावातील कार्यकर्त्यांना ताकद देऊन संघटना मजबूत करण्यावर भर
पालकमंत्री पदाच्या माध्यमातून तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या माध्यमातून गावागावातील कार्यकर्त्यांना बळ देण्यात येईल. स्थानिक पातळीवरील विकासकामांना सहकार्य करत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
पलूस येथील मेळाव्यात विधानपरिषद निवडणूक, पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय वाटचाल याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *