मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) मुख्य प्रवेशद्वारावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रवेशकमानीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना सोमवारी अचानक कमान कोसळली. या दुर्घटनेत सात मजूर जखमी झाले. सिमेंट व खडीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या मजुरांना सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढून उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सिव्हिल रुग्णालयाचे कुंपण व प्रवेशद्वार कमानीचे काम खासगी ठेकेदारामार्फत सुरू आहे. सोमवारी दुपारी सुमारे 25 फूट उंच व 30 फूट लांब कमानीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी सुमारे 25 मजूर कामावर होते. स्लॅबवर पाच, तर त्याखाली काही मजूर काम करत असतानाच अचानक मोठ्या आवाजासह स्लॅब कोसळला. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली.
मुख्य प्रवेशद्वाराजवळ रुग्ण, नातेवाईक व नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने दुर्घटनेनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्लॅबच्या ढिगार्याखाली मजूर अडकल्याचे लक्षात येताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
जेसीबी, क्रेनच्या मदतीने बचावकार्य
काही मिनिटांतच बांधकाम सुरू असलेली भलीमोठी कमान जमीनदोस्त झाल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. ढिगारा हटवून अडकलेल्या मजुरांचा शोध घेण्यासाठी क्रेन व दोन जेसीबीच्या साहाय्याने युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले. सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर सातही मजुरांना ढिगार्याखालून बाहेर काढण्यात यश आले.
अकिबुल शेख, अनिसरहमान मलिक, अरविंद कुमार, शाहिद शेख, कादर शेख, मीनारुल शेख आणि सियाराम चौधरी सर्व रा. पश्चिम बंगाल अशी जखमी मजुरांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस, अग्निशमन दलाची धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस, अग्निशमन दल आणि नागरिकांनी बचावकार्यात सहभाग घेतला. महापौर धीरज सूर्यवंशी यांनीही रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची पाहणी केली.
आठवड्यापूर्वीच कामगार आयुक्ताकडे तक्रार
मिरज सिव्हिल रुग्णालयातील बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याची तक्रार दुर्घटने अगोदर आठवड्यापूर्वीच शिंदेसेनेतर्फे कामगार आयुक्ताकडे करण्यात आली होती. कामगारांना सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली जात नसल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचे व बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर प्रवेशकमानीचा स्लॅब कोसळून सात मजूर जखमी झाल्याने बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











