सांगली महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि भाजपमध्येही अंतर्गत गदारोळ उसळी घेत आहे. काही ठिकाणी ‘जुने-नवे’ असे गट पडले असल्याचे स्पष्ट दिसत असताना, या सर्व वादांवर ठामपणे झडती घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला – पक्षात राहायचे असेल तर शिस्त पाळावी; शिस्त मोडली, तर कारवाई टळणार नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर दादा पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचाली वेगात सुरू असताना, उमेदवारीसाठी काही नेत्यांकडून ‘स्वतंत्र अर्ज’ मागवण्याचे प्रकार सुरू असल्याबाबत विचारले असता पाटील यांनी याला थेट गैरसमजुकीचे घोटाळे असे संबोधले.
त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले –
भाजपमध्ये जुने-नवे वाद असतील, काही तणाव असतील; पण सर्वांना एकत्र बसवून आम्ही मेळ घालू. कोणतेही अंतर्गत वाद महापालिका निवडणुकीत तोट्याचे होऊ देणार नाही.
मात्र भाजपवर ‘स्वतःचे राजकारण’ लादण्याचा प्रयत्न करणार्यांना दादांचा संदेश अत्यंत कठोर होता –
भाजपमध्ये राहून स्वतंत्र आघाड्या काढायच्या? मग पक्षशिस्त मोडल्याची किंमत चुकवावीच लागेल. अशांना पक्ष योग्य ते पाऊल उचलेल.
भाजपमधील काही चेहरे स्वतंत्र आघाडीची नोंदणी करून महापालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना त्यांनी थेट उत्तर देत स्पष्ट इशारा दिला – असं खेळ मांडायचं असेल तर भाजपमध्ये जागा नाही.
दरम्यान, अलीकडील नगरपालिका-नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार गटाने एकत्र येऊन लढा दिल्याने अनेक ठिकाणी समीकरणे बदलली. त्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेतही अशाच हालचाली सुरू असल्याच्या प्रश्नावर पाटील यांनी सांगितले की,
तेव्हा निवडणुका खूप होत्या, त्यामुळे काही ठिकाणी असे प्रयोग झाले. पण आता महापालिका निवडणुका कमी आहेत. समन्वय साधण्यासाठी अधिक वाव आहे.
महापालिकेच्या रणांगणात भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढावी यासाठी महायुतीकडून सक्रिय प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी उघड केले.
ही आघाडी महापालिकेत टिकेल, आणि ती यशस्वी होईलच, असा ठाम विश्वास दादांनी व्यक्त केला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











