gokul news : गोकुळच्या निवडणुकीत भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार: गोकुळ निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपावरून संघर्ष सुरू असतानाच आता भाजपने सर्वच्या सर्व म्हणजेच 25 जागांवरती उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीमधील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापुरात चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी दिली. त्यामुळे एक प्रकारे जागा वाटपावरून संघर्ष सुरू असतानाच आता भाजपच्या या निर्णयाने महायुतीमध्ये आणखी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
gokul news : गोकुळच्या निवडणुकीत भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार
महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा घ्या
कोल्हापूरमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजप आमदार आणि खासदार यांच्यासोबत गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा घ्या, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजप नेत्यांनी केली. त्यामुळे आता भाजपच्या या चालीनंतर महायुतीमध्ये सर्वाधिक ठराव असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे कोणती भूमिका घेणार? याबाबतही आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे, पात्र-अपात्र संस्थांच्या राजकारणावरून हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांच्यावर थेट हल्लाबोल केला होता. आमची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न झाला, असा सुद्धा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला होता. हा संघर्ष सुरु असतानाच भाजपकडून सर्व जागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे भाजप आमदार शिवाजी पाटील आणि हसन मुश्रीफ यांचा सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. शिवाजी पाटील यांना वगळून महायुती पॅनेल करण्यासंदर्भात सुतोवाच सुरू आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता भाजप नेत्यांनी थेट सर्व जागांवरती उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, मुश्रीफ यांनी गोकुळ बिनविरोधची शक्यता फेटाळून लावली आहे. गोकुळची निवडणूक बिनविरोध होईल असे मला वाटत नाही. नेत्यांच्या दाव्या प्रति दाव्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणे अशक्य आहे. महायुती म्हणून निवडणूक होईल आणि महायुतीच जिंकेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोणतीच बैठक झालेली नाही. 7 ऑक्टोबरपूर्वी ही बैठक होईल. फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा होईल, त्यानंतर निर्णय होईल, असे ते म्हणाले. अपात्र संस्थांच्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, अपात्र केल्या संस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य यांच्या 75 टक्के संस्था यामध्ये होत्या. 15 टक्के संस्था या काँग्रेसच्या होत्या. या संस्था वाचवण्याचा प्रयत्न आम्हालाच करावा लागला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











