ichalkaranji mahanagarpalika : इचलकरंजीचा महानगरपालिकेचा निकाल तीन तासांत लागणार; मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण : महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. 16 प्रभागांतील मतमोजणी चार विभागांमध्ये प्रत्येकी 8 टेबलांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अंतिम निकाल तीन तासांमध्ये हाती येईल. या निवडणुकीसाठी सुमारे 1600 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 74 आर्थिक संवेदनशील ठिकाणी वेब कास्टिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ichalkaranji mahanagarpalika : इचलकरंजीचा महानगरपालिकेचा निकाल तीन तासांत लागणार; मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.15) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 16 प्रभागांतील 230 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 2 लाख 48 हजार 907 मतदारांसाठी 302 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 21 झोनल अधिकारी असणार आहेत. प्रत्येक 2 तासाला मतदानाची आकडेवारी ते कळवतील. मतपेट्यांचे वाटप, संकलन आणि मतमोजणी 4 निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली होणार आहे. 74 आर्थिक संवेदनशील केंद्रे असून, त्यावर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.
600 पोलिस अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. शहरामध्ये एकही संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील केंद्र नाही. ईव्हीएम मशीनच्या कमिशनिंगचे काम पूर्ण झाले आहे. 10 टक्के मशीनरी राखीव ठेवल्या आहेत. केंद्रांवरील निवडणूक कर्मचार्यांना 2 प्रशिक्षणे देण्यात आली असून, अंतिम प्रशिक्षण आदल्या दिवशी देण्यात येईल. राजीव गांधी भवनमध्ये मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मतदान मशिनरी घेऊन जाण्यासाठी 72 वाहनांची व्यवस्था केली आहे. 2 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, 3 दिवस याठिकाणी उपस्थित असणार आहेत.
मतमोजणी प्रक्रिया
राजीव गांधी भवनमध्ये शुक्रवारी (दि.16) सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल. मतमोजणी पहिल्या व तळमजल्यावर होणार आहे. 4 निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली एकाच वेळी 4 ठिकाणी मतमोजणीस सुरुवात होईल.
प्रत्येक फेरीला एका प्रभागातील 2 ईव्हीएम मशीनवरील मतदान मोजले जाईल. म्हणजेच एका विभागात 8 टेबलांद्वारे मतमोजणी होईल. त्यामुळे प्रत्येक फेरीत 32 ईव्हीएम मशीनवरील मतांची मोजणी होणार आहे. प्रत्येक उमेदवाराच्या 2 प्रतिनिधींना मतमोजणीसाठी प्रवेश दिला जाईल.
एकाच वेळी मतमोजणीस सुरुवात
8 ते 11 फेर्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल. एकाचवेळी सर्व 16 प्रभागांतील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ज्या प्रभागात मतपेट्या कमी आहेत, त्यांचा निकाल लवकर लागणार आहे. प्रभाग क्रमांक 4 चा निकाल सर्वांत पहिला, तर प्रभाग 16 चा निकाल सर्वांत शेवटी लागेल. टपाली मतदानही या मतमोजणीसोबतच मोजली जाणार आहेत.
1372 दुबार मतदार
आयोगाने 8 हजार 798 संभाव्य दुबार मतदारांची यादी दिली होती. त्याची पडताळणी केली असता त्यामध्ये 1372 दुबार मतदार असल्याचे आढळून आले. 1199 दुबार मतदारांनी कुठे मतदान करणार, याचे स्वयंघोषणापत्र लिहून दिले आहे. उर्वरित 1522 मतदारांच्या नावासमोर दुबार शिक्का मारण्यात आला आहे.
जागा – 65
प्रभाग संख्या – 16
मतदार – 2 लाख 48 हजार 907
केंद्रे – 302
उमेदवार – 230
कंट्रोल युनिट – 367 (राखीवसह)
बॅलेट युनिट – 713 (राखीवसह)
नियुक्त कर्मचारी – 1600
पोलिस कर्मचारी – 600
झोनल अधिकारी – 21
आर्थिक संवेदनशील केंद्रे – 74
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











