ishwarpur nagarpalika news : ईश्वरपूर भाजपमध्ये जुना-नवा संघर्ष उफाळला! : ईश्वरपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा अंतर्गत संघर्षाचे वादळ उठले आहे. नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना भारतीय जनता पक्षात जुना-नवा असा वाद उफाळून आला असून पक्षातील मतभेद आता उघडपणे रस्त्यावर आले आहेत.
ishwarpur nagarpalika news : ईश्वरपूर भाजपमध्ये जुना-नवा संघर्ष उफाळला!
सम्राट महाडिकांच्या मुलाखतींना छेद देत विक्रम पाटलांचा स्वतंत्र ‘राजकीय सोहळा’
भाजपच्या वतीने नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या. सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक आणि डॉ. चिमण डांगे यांच्या उपस्थितीत सावकार कॉलनी येथे पक्षाचा अधिकृत कार्यक्रम पार पडला.
परंतु, त्याच वेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला – शिवाजी चौकातील आपल्या निवासस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांनी स्वतंत्ररित्या ‘कार्यक्रम’ राबवत इच्छुक उमेदवारांची वेगळीच मुलाखत घेतली! एकीकडे अधिकृत मुलाखतींना मोठे नेते उपस्थित असताना दुसरीकडे विक्रम पाटलांनी स्वतःची लिस्ट तयार करून ती कार्यकर्त्यांकडून पाठवून दिली. परिणामी, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला – “नेमकं मुलाखत द्यायची कुठे?” हा प्रश्न सर्वत्र ऐकू येऊ लागला.
भाजपमध्ये आजपर्यंत दबक्या आवाजात सुरू असलेला जुना-नवा संघर्ष आज उघडपणे फुलून आला. अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना वाटते – “आम्हाला डावलून नव्या लोकांना संधी दिली जात आहे”. दुसरीकडे, नव्याने सामील झालेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे – “बदलाचे वारे सुरू झाले आहेत”.
या राजकीय नाट्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली — ईश्वरपूर भाजपमध्ये दोन गटांत उघडपणे रेषा पडल्या आहेत. जिल्हा पातळीवर सम्राट महाडिक आणि आमदार खाडे-खोत यांचे नेतृत्व असताना, स्थानिक पातळीवर विक्रम पाटील आपले स्वतंत्र वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
राजकीय पटलावर आता प्रश्न उपस्थित होतो –
भाजपचा ईश्वरपूरमध्ये ‘एकसंघ चेहरा’ दिसेल का?
की, गटबाजीच्या सावलीतून पुन्हा एकदा जयंत पाटील यांना संधी मिळेल?
निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच ईश्वरपूरच्या राजकीय वातावरणात तापमान वाढले आहे.
जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संघर्ष आता ‘अंतर्गत चर्चा’ न राहता थेट चव्हाट्यावर आला आहे —
आणि या संघर्षातूनच ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणातील नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











