vita nagarpalika election : विट्यात तिरंगी लढत रंगणार

SHARE:

vita nagarpalika election : विट्यात तिरंगी लढत रंगणार : विटा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विटा पालिकेची निवडणूक ही शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांचा गट विरुद्ध भाजपचे माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील गट अशी दुरंगी लढत होणार असे वाटत असतानाच अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंकज दबडे यांनी विटा पालिका निवडणुकीत आपल्या गटाची ताकद दाखविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे विटा पालिकेच्या आखाड्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट अशी महायुतीतील घटक पक्षात तिरंगी लढत रंगणार आहे.

vita nagarpalika election : विट्यात तिरंगी लढत रंगणार

अनेक नवीन – जुन्या चेहर्‍यांना लागले नगरसेवक पदाचे डोहाळे

विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाटील आणि बाबर दोन्ही गट तयारीला लागले आहेत. दरम्यान भाजपकडून विटा पालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणार्‍या एकूण 72 उमेदवारांच्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार ड सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष ड. वैभव पाटील, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती झाल्या.

नगरपालिका निवडणूकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवार जोमाने सक्रिय झाले आहेत. विद्यमान सदस्य पुन्हा एकदा मेहरबान होण्यासाठी नवा फॉर्म्युला वापरत आहेत. स्वतः किंवा पत्नी असा पर्याय समोर ठेवत आहेत. जुन्या आणि नव्या इच्छुकांच्या मनात प्रचंड घालमेल सुरू झाली आहे. आरक्षणामुळे संधी हुकलेल्या काहीजणांनी मात्र निवडणूकीची तयारी सोडल्याचे चित्र आहे. पालिका निवडणूकीच्या निमित्ताने कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

तब्बल चार वर्षाच्या खंडानंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे.गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या विटा नगरपालिकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्याने पायाला भिंगरी बांधून इच्छुक भावी नगरसेवक होण्यासाठी आपला वॉर्ड पिंजून काढत असल्याचे चित्र आहे. नवीन चेहरेही माजी नगरसेवकांना रोखण्यासाठी रणनीती आखत असल्याचे चित्र आहे.

विटा नगरपालिकेची निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी होणार आहे. त्यामुळे दररोज संदर्भ बदलत आहेत. मात्र, प्रत्येक पक्षातून इच्छुकांची गर्दी पाहता या असल्याने नेत्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. विटा नगरपालिकेच्या एकूण 13 प्रभागातून प्रत्येकी वॉर्डात 2 नगरसेवक प्रमाणे असे एकूण 26 नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने राजकीय पक्षांना तिकीट वाटपात मोठी कसरत करावी लागणार आहे.

उमेदवार निश्चित करण्यासाठी पडद्यामागच्या हालचालींना वेग आला असून, गुप्त बैठकांचा जोर वाढला आहे. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने अद्याप दोन्ही गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निश्चित झालेला नाही. सद्यःस्थितीत विटा पालिकेच्या निवडणुकीची भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या घटक पक्षांनीच एकमेंकाविरोधात तयारी सुरू केली असली तरी प्रबळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे चित्र आहे.

अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष युवा नेते पंकज दबडे यांनी विटा पालिका निवडणुकीत आपल्या गटाची ताकद दाखविण्याचा निर्धार केला आहे. विटा पालिकेच्या आखाड्यात स्वबळावर उतरण्याचा निर्धार करून यंत्रणा सज्ज केली आहे. तर दुसरीकडे आगामी विटा पालिका निवडणूक लढविण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि सर्व समविचारी पक्षांच्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ड. बाबासाहेब मुळीक यांनी बैठक घेतली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुप्त बैठकांचा जोर वाढला असून प्रत्येक पक्ष आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. फोडाफोडी आणि जोडाजोडीच्या राजकारणामध्ये विटयातील नेते आणि कार्यकर्ते गुंतले असल्याचे दिसून येत आहे. आगामी काही दिवसात सक्षम उमेदवार निश्चित करण्याचे धोरण नेत्यांकडून अवलंबिले जाण्याची शक्यता आहे.

विटा पालिका निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि मनसे या पक्षामध्ये स्मशान शांतता असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत हे पक्ष काय भूमिका घेतात ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कार्यकर्ते जोमाने विटा नगरपालिकेच्या राजकीय सत्तासंघर्षाच्या तयारीला लागले आहेत.

सुहासभैय्यांची पहिली निवडणूक

2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुहास बाबर हे निवडून आले आहेत. आमदार झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच पालिका निवडणूक असल्याने त्यांनी विटा शहरात विशेष लक्ष घातले असून कोणत्याही परिस्थितीत यावेळी विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

राजकीय पटलावर भाजपसह शिवसेना अँक्टिव्ह मोडवर

विटा नगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधक शिवसेना शिंदे गट विटा शहराच्या राजकीय पटलावर अँक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीची जोरदार रणनीती आखली जात आहे, उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काय समीकरणे होतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *