shirol nagarpalika news : शिरोळमध्ये पक्षाबरोबर गटातटाच्या राजकारणाला महत्त्व

SHARE:

अजित पवार, जयसिंगपूर

shirol nagarpalika news : शिरोळमध्ये पक्षाबरोबर गटातटाच्या राजकारणाला महत्त्व : नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे शिरोळ नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत पक्षाबरोबरच गटातटाच्या राजकारणाला फार महत्त्व आले आहे. नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या निवडणुकीत खरा मुकाबला महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच मानला जात आहे. यामुळे नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीत जोर लावला आहे.

shirol nagarpalika news : शिरोळमध्ये पक्षाबरोबर गटातटाच्या राजकारणाला महत्त्व

शिरोळ नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून ही दुसरी निवडणूक होत आहे. दहा प्रभाग असलेल्या शिरोळ शहरात एकूण 20 नगरसेवक आणि जनतेतून एक नगराध्यक्ष निवडून द्यावयाचा आहे. या निवडणुकीत हातकलंगलेचे आमदार दलितमित्र अशोकराव माने यांच्या स्नुषा सौ. सारिका माने, यादव गटाच्या पंचायत समितीच्या माजी सदस्य सौ. योगिता कांबळे, सौ. श्वेता काळे, सौ. संगीता माने या चार इच्छुक महिला या निवडणुकीला सामोरे जातील असे सध्याचे चित्र आहे. पण राजकीय समीकरणात कोण माघार घ्यायची आणि कोणाला साथ द्यायची हे नेत्यांमध्ये झालेल्या समन्वयानंतरच स्पष्ट होणार आहे.

सामाजिक आणि राजकीय वासा आणि वारसा असलेल्या सारिका माने या हातकलंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या स्नुषा आहेत. तर माजी नगरसेवक आणि भाजप नेते डॉ. अरविंद माने यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. आमदार माने यांनी शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणी आणि छत्रपती शाहू इंडस्ट्रियल इस्टेट यासह अनेक सहकार क्षेत्रातील संस्थांचे जाळे विणले आहे. आम. माने यांनी आज तागायत केलेल्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या जोरावरच सौ. माने या निवडणुकीला सामोरे जात आहेत. सौ माने यांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडीचा पाठिंबा मिळेल असे सध्याचे चित्र आहे.

शिरोळ पंचायत समितीच्या माजी सदस्य असलेल्या सौ. योगिता कांबळे या निवडणुकीत आपले भवितव्य आजमावणार आहेत. शिरोळ नगरपालिका अस्तित्वात यावी यासाठी त्यांनी आपल्या पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा देऊन आपल्या प्रभागातील मतदार व नागरिकांच्या मनात नाव राहील असे काम केले आहे. यादव गटाचे नेते अनिल यादव आणि पृथ्वीराज यादव यांच्याशी त्या आजतागायत एकनिष्ठ राहिल्या आहेत. यामुळेच त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा ध्यास घेतला आहे.

चाबूकफोड आंदोलनाच्या माध्यमातून नावारूपाला आलेले दादा काळे यांच्या सुविद्य पत्नी सौ. श्वेता काळे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे सच्चे कार्यकर्ते असलेल्या दादा काळे यांनी एकेकाळी ऊस दराच्या आंदोलनावरून राज्यकर्त्यांना जेरीस आणले होते. काळे यांनी केलेले चाबूक फोड आंदोलन हे अद्यापही चर्चेत आहे.

या कार्याची पोहोच पावतीचा वसा उराशी बाळगून श्वेता काळे या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
अभिनयाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकार दगडू माने यांच्या सुविद्य पत्नी सौ. संगीता माने यांनी नगराध्यक्षपदाची निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे. अभिनेते अशी ओळख असलेल्या दगडू माने यांनी केलेल्या कामाच्या शिदोरीवरच संगीता माने या निवडणुकीत मतदारांना सामोरे जाणार आहेत. माने परिवाराला या निवडणुकीत जनता किती साथ देते हे आता पहावे लागणार आहे.

राज्य व देशपातळीवर शिरोळचा लौकिक..

माजी आमदार, दलितमित्र स्व. दिनकररावजी यादव यांची जन्मभूमी शिरोळ शहर आहे. स्व. यादव यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि विधिमंडळात शिरोळ विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकवेळा जिल्हा परिषद, एकवेळा विधानसभा आणि दोनवेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. तसेच शिरोळचे सुपुत्र माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ विधानसभेचे विधिमंडळात प्रतिनिधित्व केले आहे. हे सर्व मातब्बर शिरोळ शहरातीलच रहिवासी आहेत. यामुळे या गावचा लौकिक राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर झाला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *