swabhimani sanghtna news : सांगलीत ऊस दराची बैठक फिस्कटली

SHARE:

swabhimani sanghtna news : सांगलीत ऊस दराची बैठक फिस्कटली : कोल्हापूर जिल्ह्यात ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा कमी एफआरपी आहे अशा कारखान्यांनी 3500 रुपये आणि ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा अधिक एफआरपी अधिक 100 रुपये असा फॉर्म्युला मान्य केला आहे. त्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी केली. मात्र कारखान्यांनी हा फॉर्म्युला अमान्य करीत दराबाबत भूमिका जाहीर करण्यासाठी मुदत जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने पाच दिवसात दराबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले.

swabhimani sanghtna news : सांगलीत ऊस दराची बैठक फिस्कटली

स्वाभिमानीकडून दोन प्रस्ताव, जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पाच दिवसांची मुदत, आंदोलन सुरुच राहणार

त्यामुळे ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली. बुधवार (दि. 12) नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कारखानदारांच्या प्रतिनिधींना दिले. मात्र जोपर्यंत शेतकरी संघटनेचा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक घेण्यात आली. यावेळी कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर)चे संगीता डोंगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, संदीप राजोबा, सूर्यकांत मोरे, महेश खराडे, संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला विना कपात प्रति टन 3751 रुपये आणि मागील हंगामातील 200 रुपये हप्ता दिल्या शिवाय गाळप सुरु करु देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी शुक्रवार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांनी उसाला विना कपात प्रति टन 3751 रुपये आणि मागील हंगामातील 200 रुपये हप्ता असा प्रस्ताव मांडला होता. याबाबत तडजोड करण्याची आमची मानसिकता नव्हती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार सांगली जिल्ह्यातील तोच फॉर्मुला आम्ही साखर कारखानदारांना समझोत्याचा प्रस्ताव कारखानदारासमोर मांडला.

कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा कमी एफआरपी आहे, अशा कारखान्यांनी 3500 रुपये आणि ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा अधिक एफआरपी अधिक 100 रुपये असा फॉर्म्युला मान्य केला आहे. त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसाला भाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तात्काळ याबाबत निर्णय देणे शक्य नसलयाचे सांगत कारखानदारांच्या प्रतिनिधींनी मागणी अमान्य केली. काही साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी ऊस दराच्या प्रस्तावाबाबत आम्हांला संचालक मंडळाशी चर्चा करावी लागेल, त्यामुळे तात्काळ निर्णय देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

ऊस दराबाबत साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी मुदत मागून घेतली. त्यामुळे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ऊस दराच्या बाबतीत मध्यस्थी करत पाच दिवसाची मुदत दिली. सर्व साखर साखर कारखानदारांनी निर्णय देण्याचे मान्य केले. त्यामुळे ऊस दराचा तिढा सुटला नाही. जोपर्यंत साखर कारखानदार ऊस दर जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत ऊस का द्यायचा प्रश्न उपस्थित करत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

वाहतुकीबाबत याचिका दाखल करणार

कारखाने तोडणी वाहतूक वाढवून दाखवतात, 25 किमी दुसरा कारखाना परवाना सरकार देत नाही, असं असताना साखर कारखाने गाळप क्षमता कारखान्यांनी खोटे रेकॉर्ड दाखवून वाढवलेली आहे. तोडणी 439 टनाला तोडणी आहे, मात्र वाहतूक सर्वाधिक घेतली जात आहे. कारण कारखाना 100 किमी पर्यंत वाहतूक करीत आहेत, टनाला 250 ते 300 रुपयांचा भुर्दंड शेतकर्‍यांना बसत आहे. सहकारी कारखाने असल्याने कायद्यात नसून देखील यांना तोडणी वाहतूक दिली जाते. तोडणी वाहतूक खर्च वाढवला जातोय, याचा परिणाम एफआरपी वर होतोय आणि जवळ असून देखील शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे, याबाबत कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल करणार आहे.

पाच कारखान्यांकडे 11.45 कोटी एफआरपी थकित

जिल्ह्यातील राजारामबापू साखर कारखान्याचे तीन युनिट, हुतात्मा आणि दालमिया अशा पाच कारखान्यांची 11 कोटी 45 लाखांची मागील एफआरपीतील फरक थकित आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांची फरकाची रक्कम का दिली नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. सोमवारी (दि. 10) साखर आयुक्तालयामध्ये सुनावणी आहे तर बुधवार (दि. 12) तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे, त्यानंतरच यावर निर्णय होईल असे कारखानदारांनी सांगितले.

तोडणी वाहतुकीव्दारे टनाला 350 रुपयांची लूट

साखर कारखान्यांना 35 कि.मी.च्या आतील गाळप परवाने असताना खोटे रेकॉर्ड दाखवून फसवणूक केली जात आहे. कारखाने शंभर-सव्वाशे किलोमीटरवरुन ऊस आणतात. त्यामुळे तोडणी, वाहतूक खर्च 950 ते 1100 रुपयांपर्यंत जातो. 25 किलोमीटरच्या आतील तोडणी, वाहतूक 725 रुपये होते. मात्र खोटे रेकॉर्ड करुन टनाला 350 रुपयांची लूट कारखानदार करीत असल्याचा आरोप माजी खा. राजू शेट्टी यांनी केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *