पीडित तरुणीची सुटका ; तिघांना अटक
शहरातील वाघवाडी रस्त्यालगत असणार्या वृंदावन लॉज येथे सुरू असलेला अनैतिक मानवी व्यापार ( वेश्या व्यवसाय ) पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणला. वेश्या व्यवसाय करणार्या पश्चिम बंगाल मधील पीडित तरुणीची पोलिसांनी सुटका केली. बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याची खातरजमा केली. एजंट, ग्राहक, लॉज मॅनेजर अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन मोबाईल हस्तगत केले आहेत.
अभिजीत बळवंत पाटील (वय 33, रा. संभाजी चौक, ईश्वरपूर), अमोल शामराव फार्णे (वय 35, रा. तिरंगा चौक, ईश्वरपूर) आणि परशुराम भास्कर हांडे (वय 30 , रा. दत्तनगर, कामेरी रोड, ईश्वरपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाच्या समोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सांगलीचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार सुवर्णा गोडबोले यांच्या पथकाने छापा टाकला. इस्लामपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 मधील कलम 3, 4 व 5 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
महिला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सांगलीच्या सहाय्यक पोलीस फौजदार सुवर्णा गोडबोले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी 12 डिसेंबरला सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ईश्वरपूर-वाघवाडी फाटा रस्त्यावरील वृंदावन लॉजच्या रूम नं. 102 मध्ये हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पश्चिम बंगाल मधील पीडित महिला आढळून आली.
घटनास्थळावरून 3 मोबाईल फोन, सिमकार्ड, लॉज रजिस्टर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी संगनमत करून लॉजमध्ये पीडित महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ करीत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











