jaykumar gore news : सोलापूरच्या राजकारणात गोरेंच्या रणनीतीचा प्रभाव! : सोलापूरच्या राजकारणात एक नवा राजकीय झंझावात निर्माण झाला असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे आघाडीचे नेते जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला हादरवून सोडण्याचा चंगच बांधल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्याच प्रयत्नातून जिल्ह्यातील तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एका काँग्रेसचे – अशा चार माजी आमदारांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील सत्तासमीकरणे नव्याने रचली जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
jaykumar gore news : सोलापूरच्या राजकारणात गोरेंच्या रणनीतीचा प्रभाव!
या सर्व हालचालींना गती देताना जयकुमार गोरे यांनी नुकतीच सांगोल्याचे माजी आमदार आणि ज्येष्ठ पवार समर्थक दीपक साळुंखे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ही भेट केवळ औपचारिक नसून, भाजपकडून सुरू असलेल्या सत्ताविस्ताराच्या मोहिमेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे संकेत मिळत आहेत. गोरे आणि साळुंखे यांच्यात झालेली ही चर्चा राजकीय रंग घेऊन सोलापूरच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी सूचक शब्दांत दीपक साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेला दुजोरा दिला. त्यांच्या वक्तव्यातील आत्मविश्वास आणि राजकीय रणनीतीचा स्पष्ट प्रत्यय आला. या पार्श्वभूमीवर पाहता, भाजपने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची खेळी आखली असून, त्यासाठी गोरे हे रणनीतीकार म्हणून पुढे येत आहेत.
या घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वारे झपाट्याने बदलत असून, पवार समर्थक असलेल्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. सत्ता समीकरणे नव्याने रचली जात असताना, सोलापूर जिल्ह्याचे राजकारण आगामी काळात आणखी रंगतदार आणि चुरशीचे होण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. भाजपने आपली रणनीती स्पष्ट करत ‘संपूर्ण सोलापूर’ आपल्या खिजगिरीत आणण्याचा निर्धार केला आहे, आणि जयकुमार गोरे हे या मोहीमेचे शिल्पकार ठरत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











