जयसिंगपूर / अजित पवार
चालू गळित हंगामात तुटणार्या उसाला प्रतिटन विनाकपात 3751 रुपये पहिली उचल द्यावी. मागील गळित हंगामात तुटलेल्या उसाला एफआरपीसहित जादाचे 200 रूपये अंतिम बिल द्यावे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 11 नोव्हेंबर पासून आपण मैदानात उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदार व राज्य सरकारला दिला.
jaysingpur us parishad : उसाला विनाकपात 3751 रुपये पहिली उचल द्या जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांची मागणी
रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज राहण्याचे शेतकर्यांना आवाहन
जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24 वी ऊस परिषद झाली, यावेळी ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी हसन मुरसल होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले. स्वागत तानाजी वठारे यांनी, प्रास्ताविक स्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष पै. विठ्ठलराव मोरे यांनी केले.
राजू शेट्टी म्हणाले, साखर कारखाने 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे धोरण राज्य सरकारचे आहे. आम्ही तत्पूर्वी 15 दिवस ऊस परिषद घेऊन 3751 हा दर मागत आहोत. सरकार आणि कारखानदारांना या मागणीबाबत विचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे. या वेळेत त्यांनी आमची मागणी मान्य करावी. 24 ऑक्टोबरला लातूर, 25 ऑक्टोबरला परभणी येथे अशाच ऊस परिषदा होणार आहेत. यानंतर 28 ऑक्टोबरला शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आश्रमापासून नागपूरपर्यंत लाँगमार्च काढणार आहे. 10 नोव्हेंबरला आपण परत येणार आहोत. त्यापूर्वी आमच्या मागणीचा सकारात्मक विचार न केल्यास 11 नोव्हेंबरपासून रस्त्यावरच्या लढाईला सज्ज रहा, असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकर्यांना केले.

शेट्टी पुढे म्हणाले, की एआय तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्यांनी करावा, यावर साखर कारखानदार भर देत आहेत. मात्र, याच तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक शेताचे सर्वेक्षण करावे. किती टन ऊस येईल, त्याची रिकव्हरी किती लागणार, हे शेतकर्याला कळवावे. यासाठी कारखानदार टाळाटाळ करीत आहेत. हेच तंत्रज्ञान वापरून उसाची काटामारीही थांबविली जाऊ शकते. त्यामुळे शेतकर्यांचा फायदा होईल.
साखरेचा दर आणि उसाच्या टनाचा भाव सारखा असला पाहिजे. सध्या 40 रुपये किलोप्रमाणे साखर विकली जात आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे उसाला तुरे येणार आहेत. ऊस उत्पादन घटणार आहे. कारखानेही 31 जानेवारीपर्यंतच चालण्याची शक्यता आहे. कारखान्यांना ऊस कमी पडणार आहे. त्यामुळे आपला ऊस तोडण्याची गडबड करू नका.
कारखानदार तुम्हांला शोधत येतील, आणि ऊस आपल्याला देण्याची मागणी करतील. तेंव्हा आपण मागितलेला दर त्यांना द्यावाच लागेल. त्याचबरोबर ऊस तोडण्यासाठी कोणालाही रक्कम देऊ नका.
गेल्या वर्षीच्या उसाचा अंतिम दर 200 रुपये द्यायला हवा आणि चालू गळित हंगामात तुटणार्या उसाला 3751 रुपये विनाकपात घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचे नाही, असेही शेट्टी म्हणाले. सरकारच्या धोरणांमुुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. राज्यकर्त्यांवर अंकुश नसल्यामुळेच शेतकर्यांवर ही वेळ आल्याचे ते म्हणाले.
महायुती सरकारने निवडणुकीआधी दिलेला संपूर्ण कर्जमुक्तीचा शब्द पाळावा.
ऊस दराच्या प्रश्नाबाबत यंदा निर्णायक संघर्ष करायचा आहे. नागपूरच्या लाँगमार्चनंतर करेंगे या मरेंगे या भूमिकेनेच रस्त्यावर उतरावे लागणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी शेतकर्यांनी तयार रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
परिषदेला पुरंदर पाटील, विजय रणदिवे, अजित पोवार, अमर कदम, डॉ. श्रीवर्धन पाटील, पोपट मोरे, राजेंद्र गड्ड्याण्णावर, प्रकाश पोफळे, महेश खराडे, डॉ. महावीर अक्कोळे, प्रा. सुभाष शेट्टी आदिंसह महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अभय भिलवडे यांनी केले.
गगनबावड्याच्या तरुणांना आवाहन…..
शेतकर्यांचा सातबारा संपूर्ण कोरा व्हावा, या मागणीसाठी गगनबावडा तालुक्यातील 227 तरुणांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. राजकारणातील चोर-भामट्यांसाठी तुम्ही आपला जीव पणाला लावू नका. आमच्यासोबत नागपूरला चला. कसा सातबारा कोरा होत नाही, हे पाहू, असे आवाहन राजू शेंट्टी यांनी केले.
आता तुम्ही सुखवस्तू झालात…
वीस वर्षांपूर्वी तुम्ही आंदोलन करण्यासाठी, मोर्चे काढण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून येत होता. आता ऊसदर बक्कळ मिळत असल्याने सुखवस्तू झालात. ट्रॉलीतून यायला तुम्हांला लाज वाटते. मात्र, संघर्ष केल्याशिवाय सुख मिळत नाही, हे लक्षात ठेवा, अशा कानपिचक्याही शेट्टी यांनी दिल्या.
केवळ तीन वेळचा अपवाद वगळता आपली ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह क्रीडांगणावरच झाल्या आहेत. एकदा आव्हान दिल्याने कोल्हापूर येथील सासणे मैदान भरवून दाखविले. दुसर्यांदा निवडणुकीमुळे झेले चित्रमंदिराजवळ, तर तिसर्यांदा लॉकडाऊनमुळे कल्पवृक्ष गार्डनमधे परिषद झाली. मात्र, हे वगळता विक्रमसिंह क्रीडांगण हे स्थळ आम्ही बदलले नाही.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











