kolhapur crime news : कोल्हापुरात प्रवासी बसवर दरोडा; सव्वा कोटीची चांदी लुटली: पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या किनी टोल नाक्या पासून काही अंतरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला गेला. यामध्ये सुमारे सव्वा कोटी रुपये किमतीची 60 किलो चांदी आणि सोने लंपास करण्यात आले. त्यामुळे प्रवासी, व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
kolhapur crime news : कोल्हापुरात प्रवासी बसवर दरोडा; सव्वा कोटीची चांदी लुटली
याबाबत घटनास्थळी समजलेली माहिती अशी की , कोल्हापूर मधील व्यापार्याचे सोने, चांदी कोल्हापूरहून मुंबईला अंगडिया सर्विस द्वारे नेले जाते. सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथून अशोका ट्रॅव्हल्स ही बस मुंबईकरीता रवाना झाली.
कोल्हापुरातून निघालेल्या या बस मध्ये तिघे संशयित प्रवासी बसले होते. किनी टोल नाक्याजवळ बस पोहोचल्यावर त्यापैकी एकाने चालकाच्या गळ्याला चाकू लावला. बस थांबवण्यास भाग पाडले.
बस थांबताच मागून आलेल्या एका मोटारीतून दरोडेखोरांचे इतर साथीदार तेथे पोहोचले. त्यांनी बसच्या डिकीमध्ये ठेवलेली 60 किलो चांदी , एक तोळा सोने , रोख रक्कम असा सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल काही क्षणातच मोटारी मध्ये भरला. त्यानंतर ते काही क्षणात घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची माहिती बस चालकाने प्रवासी वाहतूक कंपनीच्या मालकाला दिली. घटन स्थळी पेठ वडगाव पोलीस दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरोडेखोर बस मध्ये सुरुवाती पासून बसले असल्याने त्यांनी आधीपासूनच अशा प्रकारे सोन्या-चांदीचे वाहतूक होत असल्याची खातरजमा केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक घटनांच्या आधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
सात जण ताब्यात
दरम्यान या प्रकरणाचा पोलिसांनी गतीने तपास केला. याप्रकरणी सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक जण सांगलीचा असून बाकीचे कोल्हापुरातील विक्रम नगर परिसरातील आहेत. बसच्या वाहकाने चांदी मुंबईला नेली जाणार असल्याची माहिती आपल्या भावाला दिली होती. त्यावरून भावाने इतर साथीदारांना जमवून हा दरोडा टाकला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











