sharad karkhana news : मळीमिश्रीत पाण्यामुळे भेंडवडेकरांचा शरद कारखान्यावर दगडफेक : नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्यामुळे नदी, विहिरीचे जल प्रदूषण होत असल्याने संतप्त झालेल्या भेंडवडे ग्रामस्थांनी कारखान्यावर मंगळवारी धडक मोर्चा काढला. त्यांनी कारखाना परिसरात दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रदूषण नियंत्रणाची उपाययोजना करण्याचे आश्वासन कारखाना व्यवस्थापनाने आंदोलकांना दिले.
sharad karkhana news : मळीमिश्रीत पाण्यामुळे भेंडवडेकरांचा शरद कारखान्यावर दगडफेक
संतप्त ग्रामस्थांचा कारखान्यावर मोर्चा; दगडफेकीमुळे तणाव
माजी आरोग्य राज्यमंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शरद कारखाना सुरू आहे. या कारखान्याच्या लगतच भेंडवडे हे गाव आहे. कारखान्यातून मळीमिश्रित पाणी सोडले जात असल्याने परिसरात असणारे नदी, विहिरी यांचे पाणी प्रदूषित झाले आहे. गावामध्ये जलजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहेत. जनावरांनाही या पाण्यापासून विविध प्रकारचे रोग होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याबाबत कारखाना व्यवस्थापनाकडे वारंवार कल्पना देऊनही दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करीत आज संतप्त ग्रामस्थांनी कारखान्यावर मोर्चा काढला. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. कारखान्याच्या अधिकार्यांना याबाबत विचारणा केली त्यातून शाब्दिक वाद झाला.
शरद कारखान्याकडून सोडल्या जाणार्या मळी मिश्रित सांडपाण्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ लागलेले आहेत. अनेकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. एका महिलेचा मृत्यूही याच कारणामुळे झाला होता असा दावाही यावेळी आंदोलकांनी केला. कारखाना कडून सोडल्या जाणार्या सांडपाण्यामुळे परिसरातील जलस्त्रोत खराब झालेले आहेत. विहिरींना दूषित पाणी येत असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे.
तसेच हे पाणी पिल्यामुळे पोटाचे विकार वाढलेले आहेत. याबाबत कारखाना व्यवस्थापनाला अनेक वेळा कळवूनही काहीच उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. कारखाना व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची मिली भगत असल्यामुळे या परिसरात जल प्रदूषणात वाढ झालेली आहे असेही आंदोलकांचे म्हणणे होते.
आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत वजन काटाविभागाच्या काचा फुटल्या.
काही आंदोलकांनी कारखाना व्यवस्थापनाकडून योग्य प्रकारे प्रतिसाद मिळत नसल्याने कारखान्याच्या दिशेने दगडफेक केली. त्यात वजन काटा परिसराचा काही ठिकाणी काचा फुटल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धाव घेतली. आंदोलकांशी चर्चा केली. पाणी प्रदूषणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वस्त करण्यात आले असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. ए. आवटी यांनी सांगितले.
आजच्या घटनेमुळे कारखान्याच्या पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांच्या मळी मिश्रित सांडपाण्यामुळे नदी प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे . अनेक नदीमध्ये मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ गंभीरपणे कधी पाहणार असा संतप्त सवाल आज आंदोलकांनी केला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











