लेखापरीक्षणातील अहवालातील गंभीर आक्षेपांचा हवाला,
माजी पदाधिकारी, अधिकार्यांवर आरोप
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा भारती आप्पासो चोपडे आणि उपाध्यक्ष अॅड. एस.पी. मगदूम यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालकपदाचा राजीनामा दिला. संस्थेतील कारभार, लेखापरीक्षण अहवालातील गंभीर बाबी आणि सर्वसाधारण सभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
अध्यक्षा चोपडे आणि अॅड मगदूम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही संस्थेचा कारभार पारदर्शकपणे चालविण्याचा प्रयत्न केला. बेकायदेशीर कर्जवाटप बंद करून कर्मचार्यांच्या पगार व बोनस मधून होणारी कपातही थांबविण्याचा प्रयत्न केला. आर्थिक शिस्तीसाठी मागील सर्वसाधारण सभेत ‘खिरे खांडेकर किर्लोस्कर’ चार्टर्ड अकाउंटंट कंपनीकडे लेखापरीक्षण सोपविण्यात आले होते.
2025-26 च्या लेखापरीक्षण अहवालात सदाशिव नागरी सहकारी पतसंस्था, माधवनगरच्या विलीनीकरणात सहकार विभागाच्या आदेशांचे उल्लंघन, मुख्य कार्यालयाच्या इमारत बांधकामात आर्थिक अनियमितता, संचालक व संबंधितांना कर्जावरील सवलत, वैयक्तिक व समूह कर्जमर्यादेचे उल्लंघन तसेच अपुरे तारण आणि कागदपत्रांची शहानिशा न करता कर्जवाटप केल्याच्या बाबी नमूद असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणांचा जाब विचारण्याऐवजी माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून आपल्याविरोधात पोलीस तक्रारी व अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केल्याचा आरोपही त्यांनी केला. 11 सप्टेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाहेरील व्यक्तींना बोलावून सभा उधळण्याचा प्रयत्न झाल्याचा तसेच लेखापरीक्षण करणार्या संस्थेला बदलण्यासाठी गोंधळ घातल्याचा आरोप करीत अध्यक्षा चोपडे व उपाध्यक्ष अॅड. मगदूम यांनी राजीनामा दिला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











