पुणे पदवीधर विधान परिषद निवडणूक 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, क्रांती कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते शरद लाड यांनी सांगली जिल्ह्यात आपल्या संपर्काचा धडाका सुरू केला आहे. निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यापूर्वीच संघटनात्मक बांधणी आणि मतदार संपर्कावर भर देत लाड यांनी गुरुवारी सांगली शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.
या भेटीगाठींमधून आगामी निवडणुकीचे नियोजन, पदवीधर मतदारांची नोंदणी, नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आणि संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील आणि संचालक तथा भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांची शरद लाड यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय व सामाजिक विषयांवर मनमोकळा संवाद झाला. विशेषतः पदवीधर मतदार नोंदणीला मिळणारा प्रतिसाद, नव्या मतदारांशी प्रभावी संपर्क, नोंदणी प्रक्रियेचे नियोजन आणि भविष्यातील संघटनात्मक वाटचाल यावर विचारमंथन झाले. जनसंपर्काची व्याप्ती वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवरही यावेळी चर्चा झाली.
यानंतर शरद लाड यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि चिमण डांगे उपस्थित होते. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी, मतदार नोंदणीला गती देणे, नव्या मतदारांशी संवाद वाढविणे आणि संघटनात्मक पातळीवर प्रभावी नियोजन करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली.
सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांचीही शरद लाड यांनी भेट घेतली. यावेळी पदवीधर मतदार नोंदणीचा आढावा घेत आगामी काळातील संपर्क अभियान आणि विविध संघटनात्मक उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार गाडगीळ यांच्याशी झालेला संवाद आणि त्यातून मिळालेले मार्गदर्शन आगामी नियोजनासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास लाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या सलग भेटींमुळे शरद लाड यांच्या पदवीधर मतदारसंघातील तयारीला वेग आल्याचे चित्र आहे. नेत्यांच्या भेटी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि मतदार नोंदणीवर दिलेला भर यामुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे. आता या मोर्चेबांधणीला आगामी काळात किती व्यापक स्वरूप मिळते आणि पदवीधर मतदारांपर्यंत हा संपर्क किती प्रभावीपणे पोहोचतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











