kupwad news : प्रेमासाठी थेट टॉवरवर चढला तरुण; पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी सुखरूप खाली

SHARE:

एकतर्फी प्रेमातून प्रेयसीने प्रेमाला होकार द्यावा, यासाठी एका तरुणाने चक्क कुपवाड औद्योगिक वसाहतीतील मयूर फिड्स कंपनीच्या पाठीमागील शेतात असलेल्या सुमारे 200 ते 250 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून खळबळ उडवून दिली. प्रेयसीकडून होकार मिळेपर्यंत खाली येणार नाही, असा हट्ट धरलेल्या या तरुणाने स्वतःच ‘डायल 112’ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, अथक प्रयत्न आणि समजूत काढत तरुणाला सुखरूप खाली उतरविले.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. संबंधित तरुण प्रेमाच्या मागणीसाठी थेट मोबाईल टॉवरवर चढला. टॉवरच्या उंच भागात जाऊन बसल्यानंतर त्याने ‘डायल 112’ वर संपर्क साधला. मी मुलीच्या प्रेमासाठी टॉवरवर चढलो आहे. जोपर्यंत तिच्याकडून होकार येत नाही, तोपर्यंत खाली येणार नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांसह मदत यंत्रणा घटनास्थळी

या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच आयुष हेल्पलाइन टीमलाही पाचारण करण्यात आले. तब्बल 200 ते 250 फूट उंचीवरील टॉवरवर तरुण बसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घटनास्थळी आवश्यक खबरदारी घेण्यात आली.

दरम्यान, या थरारक घटनेची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे टॉवरच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. तरुणाला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने पोलिसांपुढे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचेही आव्हान निर्माण झाले.

व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कुपवाड पोलिस ठाण्याचे सपोनी आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली एएसआय जितेंद्र जाधव , राजेंद्र कांबळे, प्रवीण मोहिते, मधुकर सरगर यांच्यासह पोलिस पथकाने या तरुणाचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्यांनी त्याच्याशी संपर्क साधून संवाद सुरू केला. व्हिडिओ कॉलद्वारे तरुणाला धीर देत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, सुरुवातीला तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. प्रेयसीने होकार दिल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचे तो वारंवार सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी घाई न करता संयमाने त्याच्याशी संवाद सुरू ठेवला. त्याची मनधरणी करत त्याला परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगण्यात आले.

अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश

कुपवाड पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. पोलिसांच्या समुपदेशनानंतर आणि सततच्या संवादातून तरुणाची समजूत काढण्यात आली. त्यानंतर तो टॉवरवरून सुखरूप खाली उतरला.
तरुण खाली आल्यानंतर पोलिसांसह अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आयुष हेल्पलाइन टीमने सुटकेचा नि:श्वास सोडला. या संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रसंगावधान राखत संयमाने परिस्थिती हाताळली.

पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक

अत्यंत बिकट आणि संवेदनशील परिस्थितीत कुपवाड पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि संयम यामुळे तरुणाचे प्राण वाचले. विशेषतः एएसआय जितेंद्र जाधव यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सातत्याने संवाद साधत तरुणाची मनधरणी केल्याने त्याला सुरक्षितपणे खाली उतरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल कुपवाड पोलिसांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अधिक वाचा