ऊस तोडणी मजुराच्या कुटुंबावर काळाचा घाला.
padmale news : पद्माळे येथे भरधाव पिकअपने एक वर्षाच्या चिमुरडीला चिरडले : मिरज तालुक्यातील पद्माळे गावामध्ये ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. आई-वडील ऊस तोडणी करत असताना मुलांसोबत खेळात मग्न असलेल्या एक वर्षांच्या चिमुरडीला भरधाव पिकअप वाहनाने चिरडले. गाडी अंगावरून गेल्याने या मुलीचा जागीच मृत्यू झाला. दीदी अनिल पवार असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
सदरचा अपघात हा गुरुवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी अनिल प्रवीण पवार (वय 35 रा. साखरी जि. धुळे) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक कैलास प्रकाश रोकडे (वय 35 रा. बहे) याच्या विरोधात गुन्हा दखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अनिल पवार हे आपल्या कुटुंबियांसह धुळे जिल्ह्यातील साखरी गावामध्ये राहतात. पवार हे आपल्या कुटुंबियांसह ऊस तोडणी करण्यासाठी सांगलीत आले आहेत.
गुरुवारी दुपारी ते कुटुंबियांसह पद्माळे गावातील आकाश जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी करत होते. यावेळी पवार यांची मुले मुलगी गुड्डू, मुलगा आदी आणि एक वर्षाची दीदी असे तिघेजण शेताच्या कडेला नारळाच्या झाडाखाली खेळत होते. यावेळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित चालक कैलास रोकडे हा त्याच्या ताब्यातील पिकअप वाहन (क्र. एमएच 13 एएक्स 7666) हि उसाचे वाडे भरून शेताच्या कडेला असलेल्या रस्त्याने भरधाव वेगात घेऊन निघाला होता.
यावेळी खेळत असलेल्या एक वर्षाच्या दीदीला वाहनाने जोराची धडक देऊन तिच्या अंगावरून वाहन नेले. यात गंभीर जखमी झालेल्या दिंदीचा मृत्यू झाला. अपघातानंतर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी अनिल पवार यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक कैलास रोकडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











