sangli election : महाविकास आघाडी – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये; जागा वाटपात घोडे अडले : महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गटाची आघाडी करण्याबाबतचा दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा रात्री उशीरापर्यंत सुरू होती. पण जागा वाटपाबाबत एकमत होत नसल्याने चर्चा पुन्हा लांबली आहे.
sangli election : महाविकास आघाडी – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये; जागा वाटपात घोडे अडले
दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्यांचे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत रविवारी दिवसभर खलबते सुरू होते. सांगलीवाडीतील प्रभाग 13, सांगलीतील प्रभाग क्रमांक 15, 16 व मिरजेतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये काँग्रेस व शरद पवार पक्षामध्ये चुरस निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात महाविकास आघाडी तयार करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना (उबाठा) एकत्र आली आहे. तर मतांची विभागणी होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) यांना एकत्र घेण्यासाठी महाविकास आघाडीकरून प्रयत्न सुरू झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भात चर्चा सुरू आहेत. रविवारी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, माजी खा. संजयकाका पाटील यांनी आ. विश्वजीत कदम व आ. जयंत पाटील यांच्याशी आघाडीबाबत चर्चा केली. पण काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जागा वगळून राष्ट्रवादी काँग्रेसला जागा देणे हे राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसला मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच, सहा, सात व वीस तर सांगलीतील प्रभाग क्रमांक 18 या पाच प्रभागातील केवळ एकच जागा महाविकास आघाडीला मिळेल. इतर जागांवर तडजोड शक्य नाही. शिवाय सांगलीतील काही जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची अडचण निर्माण झाली आहे.
यावर चर्चा पुढे सरकली नाही. रात्री उशीरापर्यंत याबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्यासह शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात दिवसभर चर्चा सुरू होत्या.
सांगली येथील प्रभाग क्रमांक 15, 16 या दोन्ही प्रभागातील प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हवी आहे. पण या ठिकाणी काँग्रेसचे इच्छूक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या जागांची तडतोड झालेली नाही. तर मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच व सांगलीवाडीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये देखील दोन्ही पक्षात चुरस निर्माण झाली आहे.
रात्री उशीरापर्यंत या संदर्भात चर्चा सुरू होती. यावर सोमवारी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना (उबाठा) मतदार असलेल्या पाच ते सहा जागांवर उमेदवारी देण्याबाबत एकमत करण्याचे सुरू होते. यावर सोमवारी (उद्या) अंतिम निर्णय होणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











