sangli election news : दादा घराणे टिकणार कीं भाजपचा भगवा फडकणार?

SHARE:

sangli election news : दादा घराणे टिकणार कीं भाजपचा भगवा फडकणार? : महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात यंदा अनेक प्रभागांत चुरस असली, तरी प्रभाग क्रमांक 11 हा संपूर्ण निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरत आहे. इथे सामना केवळ उमेदवारांमध्ये नाही, तर घराणी, निष्ठा, राजकीय वर्चस्व आणि अहंकार यांच्यात आहे. त्यामुळेच या प्रभागातील लढत ‘हाय होल्टेज’ ठरली आहे.

sangli election news : दादा घराणे टिकणार कीं भाजपचा भगवा फडकणार?

भाजपने यंदा आक्रमक भूमिका घेत सर्व 78 प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. महायुती विरुद्ध महाआघाडी असा पारंपरिक सामना अपेक्षित होता. मात्र, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना यांच्यातील जागावाटपाचा फज्जा उडाल्याने भाजप एकाकी मैदानात उतरला आहे. परिणामी, अनेक प्रभागांत भाजपला थेट लढतीला सामोरे जावे लागत आहे. त्यातील सर्वांत तीव्र संघर्ष प्रभाग 11 मध्ये पाहायला मिळतो.

या प्रभागात कांटे की टक्कर, आरपारची लढाई सुरू असून दोन्ही बाजूंनी प्रचारात कुठलीही कसर सोडलेली नाही. गल्लीबोळांत राजकारण तापले आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे.

प्रभाग 11 (ड) मध्ये तर चित्र आणखीच रंगतदार आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले, खासदार विशाल पाटील यांचे एकेकाळचे खंदे समर्थक मनोज सरगर यांच्यासमोर थेट वसंतदादांचे पणतू, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील मैदानात उतरले आहेत. ही लढत म्हणजे केवळ निवडणूक नसून, जुन्या निष्ठा विरुद्ध पारंपरिक राजकीय वारसा असा थेट संघर्ष आहे.

लोकसभा निवडणुकीत मनोज सरगर यांनी विशाल पाटील यांच्यासाठी खांद्याला खांदा लावून काम केले होते. विधानसभेतही अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारात त्यांनी जीव ओतला. मात्र, राजकारणात समीकरणे बदलतात, हेच पुन्हा सिद्ध झाले. सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत ओपन प्रवर्गातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

दुसरीकडे, दादा घराण्याचा वारसा घेऊन हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. खासदारकीनंतर आता महापालिकेत पुनरागमन करत दादा घराण्याची चौथी पिढी जनतेसमोर उभी आहे. त्यामुळे ही लढत केवळ दोन उमेदवारांची नसून, घराणेशाही टिकणार की नव्या राजकीय समीकरणांना संधी मिळणार, याची कसोटी आहे.

या प्रभागात सध्या नाराजी, फोडाफोडी आणि अंतर्गत राजकारण जोरात सुरू आहे. एकगठ्ठा मतदान कोणाच्या पारड्यात पडणार, यासाठी दोन्ही बाजूंनी कसून प्रयत्न सुरू आहेत. समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. एकंदरीत, यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक लढती असल्या तरी प्रभाग 11 ची लढत सगळ्यांवर भारी ठरणार आहे.

दादा घराण्याचा वारस पुन्हा एकदा महापालिकेत प्रवेश करणार की त्यांची वाट अडवली जाणार?

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *