sangli market commiti news : सांगली बाजार समितीचे अखेर त्रिभाजन

SHARE:

sangli market commiti news : सांगली बाजार समितीचे अखेर त्रिभाजन : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाचा निर्णय अखेर शासनाने सोमवारी अंमलात आणला. यापूर्वी मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाची अधिकृत अधिसूचना जारी केली.

sangli market commiti news : सांगली बाजार समितीचे अखेर त्रिभाजन

सत्ताधारी महाविकास आघाडीला झटका, सांगली, जत, कवठेमहांकाळ स्वतंत्र बाजार समिती

सांगली, जत आणि कवठेमहांकाळ अशा स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले, सांगलीत जिल्हा उपनिबंधक तर जत आणि कवठेमहांकाळमध्ये तालुका उपनिबंधक प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. या निर्णयाने सत्ताधारी महाविकास आघाडीला झटका देण्यात आला.

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत पणन विभागामार्फत तालुकास्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यभरातील 68 तालुक्यांमध्ये नवीन बाजार समित्या उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाला प्रथम तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. आणि त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला.

सांगली बाजार समितीच्या स्थापनेपासून जत, कवठेमहांकाळ व इतर उपबाजारांचा समावेश होता. मात्र कालांतराने या विस्तीर्ण कार्यक्षेत्रामुळे प्रशासन व आर्थिक व्यवस्थापनावर ताण येत होता. विशेषतः वसंतदादा मार्केट यार्डमधून मिळणार्‍या उत्पन्नापैकी मोठा हिस्सा जत, कवठेमहांकाळ आणि ढालगाव भागात खर्च होत असल्याने सांगली-मिरज भागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होती.

याच पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स तसेच मिरज तालुक्यातील शेतकरी यांनी स्वतंत्र बाजार समित्यांची मागणी सातत्याने केली होती. आमदार सुधीर गाडगीळ यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मांडला होता.

प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार, नव्या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन, मालमत्ता व कर्मचार्‍यांचे समायोजन तसेच पायाभूत सुविधांच्या उभारणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. शेतकरी व व्यापार्‍यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सांगली बाजार समितीत जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण हे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. तर उपनिबंधक बिपीन मोहिते चेतन जावीर यांनी प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला. जतमध्ये सहाय्यक उपनिबंधक अनुष्का देशमुख आणि कवठेमहांकाळमध्ये सहाय्यक उपनिबंधक प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला.

दरम्यान, बाजार समितीवर सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असून, जयंत पाटील यांच्या गटाचे वर्चस्व आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता असलेल्या सांगली बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करीत दणका दिला आहे. 5 मार्च 2026 रोजी जयंत पाटील यांचे समर्थक आनंदराव नलवडे यांची सभापतीपदी निवड झाली होती, अवघा एक महिना होतो ना होतो तोच हा शासनाने हा निर्णय घेतल्याने हा राजकीय दणका मानला जात आहे.

18 वर्षांनंतर पुन्हा त्रिभाजन

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता. मात्र 2008 मध्ये तीव्र विरोध आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे तो निर्णय रद्द करण्यात आला होता. माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांनी त्या काळात या विषयासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर तब्बल 18 वर्षांनी पुन्हा शासनाने त्रिभाजनाचा निर्णय घेतला.

बाजार समितीच्या सत्ता समीकरणाला धक्का

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या साडेतीन वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव होता. माजी मंत्री आ. जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. रोहित पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी आ. विक्रमसिंह सावंत या नेत्यांच्या गटाचे बाजार समितीवर वर्चस्व होते. या गटाच्या सत्ताकाळात समितीचे नियंत्रण मजबूत झाले असतानाच आता झालेल्या त्रिभाजनाच्या निर्णयामुळे या सत्ताकारणाला मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः दीर्घकाळ एकत्रित असलेली बाजार समिती विभागली गेल्याने या गटाच्या राजकीय प्रभावावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *