raju shetti news : एफआरपीचे थकित 180 कोटी न दिल्यास महसुली नोटीस देण्यास भाग पाडू

SHARE:

raju shetti news : एफआरपीचे थकित 180 कोटी न दिल्यास महसुली नोटीस देण्यास भाग पाडू : सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे 180 कोटींची एफआरपी थकित आहे. दोन महिने कारखाने बंद होऊन देखील पैसे दिले नाहीत. साखर आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला. पण दाद मिळत नाही. आठ दिवसात 180 कोटींचा भरणा न केल्यास साखर आयुक्तांना महसुली नोटीस देण्यास भाग पाडू, असा इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिला.

raju shetti news : एफआरपीचे थकित 180 कोटी न दिल्यास महसुली नोटीस देण्यास भाग पाडू

अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने सरकारकडून मदतीची घोषणा झाली मात्र, सांगली जिल्ह्यात त्याबाबत काही हालचाली नाहीत. त्यामुळे जिल्ह्याला कोणी वाली आहे का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक माजी खा. शेट्टी यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर ते बोलत होते. राज्यातील ऊस हंगाम संपला आहे. परंतु अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले. एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे साखर आयुक्त सांगतात. जुलै महिन्यात सुप्रिम कोर्टात सरकार गेले आहे. आठ महिने झाले नऊ सुनावण्या झाल्या, मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्ट स्थगिती देत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करून कारखानदार एफआरपी देत नाहीत. सरकार कारखानदारांच्या पाठीशी राहत आहे.

जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी आठ दिवसाच्या आत 180 कोटींचा भरणा दिला नाही तर महसुलीच्या थकितची नोटीस त्यांना साखर आयुक्तांना द्यायला लावू. साखर आयुक्तांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करणार आहे. ते बंगाल निवडणुकीसाठी गेले आहेत ते आल्यावर त्यांना भेटून भूमिका मांडणार असल्याचे माजी खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.

सांगली जिल्ह्याला कोणी वाली आहे का?

अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे द्राक्ष पिकांची गर्भधारणा झाली नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. सरकारकडून मदतीची घोषणा झाली मात्र, सांगली जिल्ह्यात त्याबाबत काही हालचाली नाहीत. सांगली जिल्ह्याला कोणी वाली आहे का नाही? नुकसानीचे पंचनामे होण्याची गरज आहे. प्रशासन सुस्त असल्याची टीकाही माजी खा. शेट्टी यांनी केली.

कर्जमाफीचा गरजुंना लाभ मिळणार नाही

दोन लाखांचे पीक कर्जमाफी जाहीर केली. पण यावर्षी पावसाळ्यात जो पाऊस पडला. त्यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याकाळात खरीप पिकांवर शेतकर्‍यांनी कर्ज काढले, त्यांना कर्जमाफीची गरज आहे. पण ते शेतकरी यात येत नाहीत. कारण त्यांचे कर्ज थकित नाही. मग ही कर्जमाफी कोणासाठी केली आहे? जे खरे गरजू आहेत त्यांना याचा लाभ होणार नाही. इथेही शेतकर्‍यांची फसवणूकच झाली असल्याचा आरोप माजी खा. शेट्टी यांनी केला. यावेळी स्वाभिमानीचे कार्याध्यक्ष संदिप राजोबा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन आखणीतील शक्तिपीठ महामार्गाला विरोधच

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आम्ही आंदोलन उभारले. त्याला सांगली परिसरातून पिटाळण्यात आम्हाला यश आले आहे. नवीन महामार्गाच्या आखणीतील शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. हा रस्ता अव्यवहार्य आहे. यात 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार आहे. या महामार्गामुळे शिराळा तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याचा धोका माजी खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. 70 हजार कोटी रुपये काढण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने 1 लाख कोटी का भरावे ? धार्मिक कारण सांगून केवळ रस्त्याच्या बांधकामातून पैसे मिळवणे हा एकमेव धंदा आहे. एका उद्योगपतीच्या खनिजासाठी महाराष्ट्राच्या जनतेस वेठीला धरले जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *