sangli news : नाराज मंगेश चव्हाण यांना राष्ट्रवादीचा गळ शहर जिल्हाध्यक्षपदाची ऑफर : संजय बजाज यांनी केली चर्चा : गेल्या वर्षभरापासून नाराज असलेल्या काँग्रेसचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने गळ टाकला आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी नुकतीच त्यांच्या घरी भेट देवून प्रवेशासंबंधात अर्धातास चर्चा केली. या दरम्यान चव्हाण यांना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद देण्याची ऑफरही देण्यात आल्याचे समजते.
sangli news : नाराज मंगेश चव्हाण यांना राष्ट्रवादीचा गळ शहर जिल्हाध्यक्षपदाची ऑफर : संजय बजाज यांनी केली चर्चा
एकूणच भाजपसमोर एकत्रित महाविकास आघाडीतून आव्हान उभे करण्याची घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एकमेकांच्या पदाधिकार्यांना फोडाफोडीच्या खेळी सुरू आहेत. त्यामुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा येत्या दहा दिवसात होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नेते, पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. सध्या काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदावरून पक्षात राजकीय वाद पेटला आहे. शहर जिल्हाध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण व राजेश नाईक इच्छूक आहेत. आ. विश्वजीत कदम यांनी मंगेश चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र खा. विशाल पाटील हे राजेश नाईक यांच्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे चव्हाण व नाईक यांच्यात वाद रंगला आहे. या वादात शहर जिल्हाध्यक्षपदाची निवड रखडली आहे.
मंगेश चव्हाण हे काँग्रेस नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांचे निष्ठावंत आहेत. यापूर्वी त्यांनी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांचा शहर तसेच प्रामुख्याने प्रभाग 15 वर मोठा पगडा आहे. मागील महापालिका निवडणुकीत भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात काकांचे नातेवाईक सावर्डेकर बंधुंचा त्यांनी पराभव करून भाजपला झटका दिला होता.
सध्याही या प्रभागाची मदार त्यांच्यावरच आहे. पण शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या लांबलेल्या निवडीवरून ते काँग्रेसवर नाराज आहेत. प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षाने डावलले तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये अपक्ष पॅनेल लावण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मंगेश चव्हाण नाराज असल्याचे कळताच सोमवारी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी मंगेश चव्हाण यांची घरी जाऊन भेट घेतली. आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा देखील झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमच्या सारख्या युवा नेतृत्वाची गरज आहे, तुम्ही पक्ष प्रवेश करा आम्ही तुम्हाला शहर जिल्हाध्यक्षपद देतो, असे जाहीर करून टाकले.
दरम्यान मंगेश चव्हाण यांनी मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय दिला नसल्याचे वृत्त आहे. पण काँग्रेसमध्ये डावल्यास त्यांनी प्रभाग क्रमांक 15 मध्ये अपक्ष पॅनेल लावण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस नेते चव्हाण यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होणार की चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











