sangli news : महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर जुळले जागा वाटप पूर्ण; दोन प्रभागात मैत्रीपूर्ण लढत : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गटाने आघाडी करण्याचा निर्णय घेतला. मनपा क्षेत्रातील 18 प्रभाग तिन्ही पक्षांनी वाटून घेतले आहेत. केवळ मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस व सांगली येथील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये घोळ सुरू असल्याने मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत मिळत आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी होणार आहे.
sangli news : महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर जुळले जागा वाटप पूर्ण; दोन प्रभागात मैत्रीपूर्ण लढत
महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप विरोधात एकसंघ आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला यश येत आहे. काँगे्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने महाविकास आघाडीची घोषणा केली आहे. शिवसेना (उबाठा) ला देखील बरोबर घेतले जात आहे. त्यानंतर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर हातमिळवणी करून आघाडी करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून या चर्चा सुरू आहेत.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील व माजी खा. संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी रात्री ना. मकरंद पाटील, आ. इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम, खा.विशाल पाटील यांच्यात चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, समितीचे प्रमुख मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, निरीक्षक शेखर माने उपस्थित होते.
भाजप विरोधात महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी प्रभाग तिन्ही पक्षात वाटून घेतले आहेत. पण मिरज येथील प्रभाग क्रमांक वीसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गटाकडून आ. इद्रिस नायकवडी यांचे सुपुत्र, माजी नगरसेवक अतहर नायकवडी इच्छूक आहेत. तर मिरज राष्ट्रवादी काँगे्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अभिजीत हारगे देखील या प्रभागातून इच्छूक आहेत.
दोघे देखील माघार घेण्यास तयार नाहीत. तशीच परिस्थिती सांगली येथील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गटाकडून बिरेंद्र थोरात इच्छूक आहेत. पण काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी जागा सोडण्यास नकार दिला जात आहे.
हा वाद मिटविण्याचा प्रयत्न सोमवारी रात्री उशीरापर्यंत करण्यात येत होता. मात्र वाद मिटत नव्हता. हा वाद न मिटल्यास या दोन्ही प्रभागातील महाविकास आघाडी विरूध्द राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत आहेत. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे अनेजण इच्छूक आहेत.
या इच्छुकांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न रात्री उशीरापर्यंत आ. जयंत पाटील व खा. विशाल पाटील यांच्याकडून सुरू होता. काही प्रभागात तोडगा निघालेला आहे. उमेदवार देखील तयार केले आहेत. पण प्रभाग क्रमांक पंधरा व सोळामध्ये एक-दोन जागांचा घोळ सुरू आहे. हा मंगळवारी सकाळपर्यंत संपेल आणि महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपचे नाराज आघाडीतील नेत्यांच्या भेटीला…
भारतीय जनता पार्टीने एक-दोन प्रभाग वगळता इतर ठिकाणी उमेदवारांना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे नाराज झालेले अनेक इच्छूक आता पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गटाच्या नेत्यांची सोमवारी भेट घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केली. अनेकांना शब्द दिला असल्याचे बोलले जात आहे. तर अनेकजण निर्णयाविना परतले असून त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची वाट धरली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











