तासगाव-मणेराजुरी मार्गावर भीषण अपघातात पित्याचा तीन वर्षांच्या मुलीसह मृत्यू;

SHARE:

तासगाव-मणेराजुरी मार्गावर भीषण अपघातात पित्याचा तीन वर्षांच्या मुलीसह मृत्यू;

पत्नी गंभीर जखमी

तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पित्याचा आणि अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीला शाळेतून घरी आणण्यासाठी मुलीला सोबत घेऊन गेलेल्या पित्याचा परतीच्या वाटेवरच मृत्यू झाल्याने चिंचणी, वासुंबे आणि तासगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी येथील रहिवासी आणि सध्या वासुंबे येथे वास्तव्यास असलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाबुराव जाधव यांचे पुत्र सागर जाधव (वय 38) हे दुचाकी क्रमांक एमएच 10 सीएफ 3864 वरून त्यांची तीन वर्षांची मुलगी हर्षिता हिला घेऊन तासगाव-मणेराजुरी रस्त्यावरील एका शाळेत पत्नी सोनाली जाधव यांना घेण्यासाठी गेले होते.
शाळा सुटल्यानंतर पत्नीला सोबत घेऊन तिघेही एकाच दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच 09 सीए 9478 क्रमांकाच्या पिकअप वाहनाला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले.
या अपघातात सागर जाधव आणि त्यांची चिमुकली मुलगी हर्षिता यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सोनाली जाधव गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
घरापासून काही मिनिटांवरच काळाचा घाला!
पत्नीला शाळेतून घरी आणण्यासाठी सागर जाधव आपल्या चिमुकल्या मुलीला घेऊन गेले होते. शाळा सुटल्यानंतर पत्नीला सोबत घेऊन तिघेही घरी परतत होते. घरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असतानाच त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियतीने पिता आणि चिमुकल्या मुलीची साथ हिरावून घेतली.
एका क्षणात संसार उद्ध्वस्त
एकाच कुटुंबातील पित्याचा आणि अवघ्या तीन वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सागर जाधव आणि हर्षिता यांच्या मृत्यूची वार्ता समजताच चिंचणी व वासुंबे परिसरात शोककळा पसरली. पित्याच्या कुशीतून चिमुकली कायमची निघून गेली आणि कुटुंबाचा आधारही हिरावला, या दुहेरी आघाताने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *