राजारामबापू कारखान्याचा दिल्ली येथे सामाजिक उत्तरदायित्व पुरस्काराने सन्मान होणार

SHARE:

राजारामबापू कारखान्याचा दिल्ली येथे सामाजिक उत्तरदायित्व पुरस्काराने सन्मान होणार

भारत सरकारच्या मुख्य साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने राजारामबापू साखर कारखान्याची निवड केलेली आहे.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने गेले कित्येक वर्षापासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ऊस उत्पादक शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांच्यासाठी राबविलेल्या विविध योजना व उपक्रमांची दखल घेत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा देशाची राजधानी दिल्ली येथे विशेष पुरस्काराने सन्मान केला जात आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने मंगळवार दि.22 सप्टेंबर रोजी एका शानदार सोहळ्यात अवार्ड फॉर कोऑपरेटिव्ह सोशल रिस्पॉसबिलीटी इन हाय रिकव्हरी एरिया हा राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. भारत सरकारच्या मुख्य साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने राजारामबापू साखर कारखान्याची निवड केलेली आहे. फेडरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश नाईकनवरे यांनी पत्राद्वारे कारखान्यास कळविले आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्यातील इंच न इंच जमीन ओलीताखाली आणण्याचे स्वप्न पाहून कामाला सुरुवात केली. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी आपल्या अथक परिश्रमातून पूर्ण केले. कारखान्याच्या माध्यमातून 38 सहकारी पाणी पुरवठा संस्था उभा करून वाळवा तालुका सुजलाम-सुफलाम केला. राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून वाळवा तालुक्यात सुमारे एक हजारच्यावरती बोअर मारून पाण्याची व्यवस्था केली. तसेच गावोगावच्या पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले आहे. ऊस उत्पादक सभासदांच्या मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाला आर्थिक हातभार लावला जात आहे. तसेच कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकर्‍याच्या बांधावर आधुनिक तंत्रज्ञान पोचविले जात आहे. ठिबक सिंचन योजना, सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजना, शेतकर्‍याच्या बांधावर शुद्ध बियाणे रोपे पोच आदी योजना ना नफा ना तोटा तत्वावर राबविल्या जात आहेत. संपूर्ण देशात सर्वप्रथम ड्रोनद्वारे औषध फवारणी सुरु केली असून अद्यावत मल्टीस्पेक्ट्रम ड्रोन शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिला जात आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना राजारामबापू ऊस भूषण पुरस्कार देवून प्रोत्साहन दिले जात आहे. ऊस उत्पादक शेतकरी, सेवा निवृत्त कर्मचार्‍यांना आरोग्य सुविधा दिल्या जात असून कर्मचार्‍यांचा आरोग्य विमा उतरविला आहे. राजारामबापू साखर कारखान्याने गेल्या 40-45 वर्षांमध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवलेल्या विविध उपक्रम व योजनांचा विचार करून हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण
हा पुरस्कार आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आमच्या साखर कारखान्याने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांना केंद्रबिंदू मानून जे काम केले हे, त्यांचे फलीत म्हणजे हा पुरस्कार आहे. यामध्ये कारखान्याचे संचालक, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, अधिकारी व कामगारांचे योगदान मोलाचे आहे, अशी प्रतिक्रिया राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते प्रतिक पाटील यांनी दिली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *