सांगली जिल्ह्यातील 9 कारखान्यांना 168 कोटींचे सॉफ्ट लोन

SHARE:

सांगली जिल्ह्यातील 9 कारखान्यांना 168 कोटींचे सॉफ्ट लोन

थकित एफआरपीसह हंगामाच्या पूर्वतयारीसाठी निधी

ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना 2025-26 च्या गाळप हंगामातील थकित एफआरपीची रक्कम देण्यासह आगामी गाळप हंगामाच्या पूर्व तयारीसाठी सरकारने सॉफट लोन दिले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांचा समावेश असून 168 कोटी 33 लाख रुपयांचे सॉफट लोन मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे. राजारामबापू कारखान्याचे चार युनिटसह विश्वास, सोनहिरा, क्रांती, हुतात्मा आणि मोहनराव शिंदे या कारखान्यांचा समावेश आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांना तब्बल 168 कोटी 33 लाख रुपयांच्या ‘सॉफ्ट लोन’चा आर्थिक आधार मिळणार आहे. विशेष म्हणजे या कर्जावरील व्याजाचा भार राज्य शासन उचलणार असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निधीतून प्रामुख्याने 2025-26 हंगामातील थकीत एफआरपी शेतकर्‍यांना देण्यास, तसेच एफआरपीची थकबाकी नसलेल्या कारखान्यांना 2026-27 गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी निधी वापरता येणार आहे.
जिल्ह्यातील क्रांती कुंडल कारखान्याला सर्वाधिक 30.14 कोटी, ‘सोनहिरा’ला 27.61 कोटी, राजारामबापू (साखराळे) 23.86 कोटी, हुतात्मा (वाळवा) 16.51 कोटी, राजारामबापू (वाटेगाव) 16.44 कोटी, मोहनराव शिंदे (आरग) 15.25 कोटी, विश्वास (चिखली) 14.43 कोटी, राजारामबापू (कारंदवाडी) 13.22 कोटी आणि राजारामबापू (जत) 10.87 कोटींच्या कर्जासाठी पात्र ठरले आहेत.
या कर्जाची परतफेड 1 ऑक्टोबर 2026 पासून सात वर्षांत करावी लागणार आहे. त्याच कालावधीसाठी शासनाकडून व्याज अनुदान दिले जाणार आहे. बँकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत मंजूर व वितरित केलेली कर्जरक्कम योजनेसाठी पात्र राहणार आहे. राज्यातील एकूण 102 सहकारी साखर कारखान्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, सात वर्षांच्या कालावधीत सुमारे 738.51 कोटी रुपयांचे व्याज अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. त्यामुळे सांगलीतील कारखान्यांना थकीत एफआरपी भागविण्यासह आगामी गाळप हंगामासाठी आर्थिक नियोजन करण्यास मोठी मदत होणार आहे.

या कारखान्यांना मिळाले सॉफट लोन
कारखाना सॉफटलोन कोटीत
क्रांती कुंडल 30.14
सोनहिरा वांगी 27.61
राजारामबापू (साखराळे) 23.86
राजारामबापू (वाटेगाव) 16.44
राजारामबापू (कारंदवाडी) 13.22
राजारामबापू (जत) 10.87
विश्वास (चिखली) 14.43
हुतात्मा (वाळवा) 16.51
मोहनराव शिंदे (आरग) 15.25

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *