सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
सांगलीच्या ऐतिहासिक श्री गणपती पंचायतन संस्थानमधील सुरू असलेला वाद आता आणखीनच तापण्याची शक्यता आहे. अभिनेत्री भाग्यश्रीने गणपती मंदिरात जाऊन आरती केल्यानंतर हा वाद नव्याने उफाळून आल्याचं चित्र आहे. त्यावर आता संस्थानचे प्रमुख विजयसिंह राजे पटवर्धन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आजारा नाही, माझी तब्येत बरी आहे. कुणाला जर तसे वाटत असेल तर आजही या, किमान दोघांना लोळवण्याची ताकद आपल्यात आहे, असं विजयसिंह राजे पटवर्धन यांनी म्हटलंय. भाग्यश्रीने जे कृत्य केलं आहे ते चुकीचं आहे, तिने माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये ऐन गणेशोत्सवात उत्तराधिकारी पदावरून आणि पूजेच्या मानावरून कौटुंबिक वाद उफाळून आला. आपले वडील आजारी असतात, त्यामुळे आपण गणपतीची पूजा केली, असं भाग्यश्रीने म्हटलं होतं. त्यावर विजयसिंह राजे पटवर्धन यांनी जोरदार टीका केली.
आदित्यराजे हेच कायदेशीर वारस
विजयसिंह राजे पटवर्धन म्हणाले की, मला मुलगा नसल्याने हिंदू वारसा कायदा आणि सांगली पंचायतन कायदा 1940 प्रमाणेच युवराज आदित्यराजे यांना दत्तक घेतलं आहे. हा दत्तक वारसा हा कायदेशीर असून संस्थानचा एकमेव वारस हे आदित्यराजे असतील. राजा हा संस्थानचा प्रमुख असून त्यांनी सर्व विधी वेळोवेळी पार पाडायच्या असतात. आदित्यराजे यांना त्या पद्धतीने चालीरिती समजावून सांगण्यात आल्या असून त्या पद्धतीने पुढे सुरू राहतील. आदित्यराजे यांनी एक दिवस आधी गणपतीची पूजा केली असताना भाग्यश्रीने दुसर्या दिवशी तीच पूजा केली, ते कितपत योग्य आहे? तिला कुणी अधिकारी दिला. गणपती संस्थानची एकदा पूजा झाल्यानंतर ती परत करणे कितपत योग्य आहे?
भाग्यश्रीने गणपती संस्थानच्या गुरुजींनाही अपमानास्पद वागवलं. भाग्यश्रीने गुरुजींची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी यावेळी विजयसिंह राजे पटवर्धन यांनी केली. भाग्यश्रीने जे कृत्य केलं ते चुकीचं आहे. तिच्या या कृत्यात आपल्या इतर दोन मुली सामील नाहीत, असंही विजयसिंह राजे पटवर्धन यांनी स्पष्ट केलं.
सांगली संस्थानचा हा कौटुंबिक आणि प्रशासकीय वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही वर्षांपूर्वी, सन 2013 ते 2016 या दरम्यान श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी संस्थानच्या कारभाराची जबाबदारी भाग्यश्री यांचे पती हिमालय दासानी यांच्याकडे दिली होती. मात्र, जावयाने संस्थानच्या जमिनी परस्पर विकल्याचा आरोप करत विजयसिंह राजे यांनी त्यांच्याकडील सर्व अधिकार काढून घेतले. यानंतर भाग्यश्री आणि हिमालय यांनी सांगलीत येणे बंद केले होते.
सन 2016 ते 2021 या दरम्यान स्वतः विजयसिंह राजे यांनी संस्थानचा कारभार पाहिला. 2021 मध्ये त्यांनी राणीसाहेबांच्या भाच्याकडे (जयदीप अभ्यंकर) कारभार सोपवला. पुढे 2023-24 मध्ये जयदीप अभ्यंकर यांचा 16 वर्षांचा मुलगा आदित्य याला दत्तक घेऊन विजयसिंह राजे यांनी त्याला अधिकृत उत्तराधिकारी (युवराज आदित्यराजे पटवर्धन) घोषित केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











