tasgaon election news : तासगावात दोन माजी नगराध्यक्षांनी सोडली राष्ट्रवादीची साथ : तासगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी डावपेच सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष अजय पाटील आणि माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदार रोहित पाटील यांची साथ सोडल्याने मोठा राजकीय भूकंप झालेला आहे. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर गटाला सुरुंग लागल्याने नाराजी आणि बंडखोरी उफाळून आली आहे.
tasgaon election news : तासगावात दोन माजी नगराध्यक्षांनी सोडली राष्ट्रवादीची साथ
तासगाव नगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आमदार रोहित पाटील गटाने कंबर कसली आहे. गेल्या दहा वर्षांपासून पालिकेवर सत्ता नसल्याने यंदा विजय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रणनीती आखण्यात आली आहे. दरम्यान, विरोधी बाजूने माजी खासदार संजय पाटील गटानेही जोरदार तयारी करत शड्डू ठोकला आहे. त्याचबरोबर भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानेही उमदे उमेदवार उभे करून निवडणुकीत आव्हान दिले आहे.
आमदार रोहित पाटील यांच्या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे आणि अजय पाटील यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. दोघांनाही अर्ज भरायला सांगण्यात आले होते. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी दोघांनाही थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे दोघांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.
यानंतर अचानक राजकीय समीकरणे बदलली. अजय पाटील यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत या पक्षाकडून आपल्या पत्नीची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित केली. तर अमोल शिंदे यांनी आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.
स्व. आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दीर्घ काळ काम केलेल्या या दोन्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची उमेदवारी डावलण्यात आल्याने गटात मोठी असंतोषाची लाट पसरली आहे. परिणामी दोघांनीही आमदार रोहित पाटील यांची साथ सोडल्याने गटाला मोठा धक्का बसला आहे.
आता या धक्क्यातून आमदार गट कसा सावरतो, बंडखोरी रोखण्यात यश येणार का, हा प्रश्न उभा राहिला आहे. अमोल शिंदे यांच्या बंडखोरीला रोखण्यात कसब दाखवता येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे अजय पाटील ’नको अंजनी, नको चिंचणी’ अशी भूमिका घेत तासगावकरांचा स्वाभिमान जागवू शकतात का, याकडे लक्ष आहे.
या घडामोडींमुळे तासगाव नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची व रोचक होणार आहे. राजकीय समीकरणांमध्ये मोठा उलथापालथीचा माहोल निर्माण झाला आहे. आमदार रोहित पाटील गटाची पुढील पावले काय असतील, आणि याचा प्रत्यक्ष निकालावर किती परिणाम होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











