vidhansabha news : मार्च 1978 : जोशींचे मुख्यमंत्रीपद हुकले, दादा पुन्हा मुख्यमंत्री : 1978 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात नाट्यमय आणि अनिश्चित निवडणुकांपैकी एक ठरली. इंदिरा काँग्रेस, रेड्डी काँग्रेस, जनता पक्ष आणि शंकरराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेस अशा अनेक आघाड्यांमध्ये ही लढत रंगली होती.
vidhansabha news : मार्च 1978 : जोशींचे मुख्यमंत्रीपद हुकले, दादा पुन्हा मुख्यमंत्री
जनता पक्षाने शेकाप, कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि शंकरराव चव्हाण यांच्या काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. महाराष्ट्राने यापूर्वी इतकी बहुरंगी आणि चुरशीची निवडणूक कधी पाहिली नव्हती. तिरंगी आणि चौरंगी लढतींमुळे अनेक नव्या चेहर्यांना संधी मिळाली आणि पुढे त्यांच्यापैकी अनेक जण राज्याच्या राजकारणातील मोठी नावे ठरली.
निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अभूतपूर्व त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. 288 जागांच्या विधानसभेत वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील रेड्डी काँग्रेसने 259 जागा लढवून 69 जागा जिंकल्या. नासिकराव तिरपुडे यांच्या नेतृत्वाखालील इंदिरा काँग्रेसने 215 जागा लढवत 99 जागांवर विजय मिळविला. जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचे मिळून 135 आमदार निवडून आले, तर 12 अपक्ष आमदारांनी सत्ता स्थापनेचे गणित अधिकच गुंतागुंतीचे केले.
जनता पक्ष हा सर्वात मोठा गट म्हणून पुढे आला होता. सत्ता स्थापनेसाठी त्यांना अवघ्या आठ आमदारांची गरज होती. केंद्रात मोरारजी देसाई यांचे सरकार सत्तेवर होते आणि दिल्लीतील सत्ताकेंद्रातून महाराष्ट्रातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले जात होते. मोरारजी देसाई यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना मुंबईत पाठवले. रातोरात राजकीय हालचालींना वेग आला. जनता पक्षाने अपक्ष आणि काँग्रेसविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला. बैठकीत ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने पुढे आले.
राज्यपाल सादीक अली यांच्याकडे जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता पक्षाला अपक्षांचा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा केला आणि एस. एम. जोशी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची विनंती केली. राज्यपालही त्या दिशेने सकारात्मक होते. महाराष्ट्राला जनता पक्षाचा पहिला मुख्यमंत्री मिळणार, हे जवळपास निश्चित मानले जाऊ लागले होते.
मात्र, याच क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणाने अनपेक्षित कलाटणी घेतली.
एस. एम. जोशी मुख्यमंत्री होणार, ही बातमी दोन्ही काँग्रेसच्या गोटात पोहोचताच दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय हालचालींना वेग आला. निवडणुकीत एकमेकांविरोधात कट्टर लढलेले इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस हे दोन गट अचानक एकत्र आले. महाराष्ट्रात जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली.
त्यांनी दिल्लीत जाऊन यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी आणि चंद्रशेखर यांच्याशी चर्चा केली. सत्ता हातातून निसटत असल्याचे लक्षात येताच इंदिरा गांधी यांनीही आपला विरोध बाजूला ठेवत दोन्ही काँग्रेसच्या एकत्रीकरणाला हिरवा कंदील दिला.
अखेर तडजोडीचा फॉर्म्युला ठरला – वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री. दोन्ही काँग्रेसच्या आमदारांची यादी घेऊन नेतेमंडळी राज्यपालांकडे पोहोचली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. विरोधकांना पूर्णपणे अंधारात ठेवत काँग्रेसने सत्तेचा डाव साधला होता
7 मार्च 1978 रोजी वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची. या मंत्रिमंडळात शरद पवार यांना उद्योग खात्याची जबाबदारी मिळाली. महाराष्ट्रातील पुढील राजकीय घडामोडींना दिशा देणार्या या सरकारने राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










