zp election news : मिनी मंत्रालयाच्या शुक्रवारपासून रणसंग्रामास सुरु : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तब्बल पावणेचार वर्षे लांबलेल्या निवडणुकीचा बहुचर्चित रणसंग्राम आजपासून (शुक्रवारपासून) सुरू होत आहे. जिल्हा परिषदेच्या 61 गटांसह पंचायत समितीच्या 122 गणांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
zp election news : मिनी मंत्रालयाच्या शुक्रवारपासून रणसंग्रामास सुरु
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु, राजकीय पक्षांची डोकेदुखी
या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कमी कालावधीमध्ये थेट निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती या ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे मागील काही वर्षांपासून रखडल्या होत्या. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश देत निवडणूक प्रक्रिया तातडीने राबवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा ग्रामीण राजकारणाची धुमश्चक्री सुरू होणार आहे.
जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू होती. जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गण तसेच आरक्षणाची सोडत तब्बल चार महिन्यांपूर्वीच निश्चित करण्यात आली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांची तयारी अपुरी राहिल्याचेही चित्र आहे.
शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरु होत असून 21 जानेवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्याच्या कालावधीत शनिवार आणि रविवारची सुट्टी येत आहे. यादिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार का, याबाबत अद्याप निवडणूक विभागाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे सोमवारपासून अर्ज भरण्यास बुधवारपर्यंत असे तीनच दिवस मिळतील. 22 जानेवारीला अर्जाची छानणी होईल. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत 27 जानेवारी आहे.
कमी कालावधीत उमेदवार निश्चित करणे, पॅनल आखणी, सामाजिक व राजकीय समतोल साधणे आणि संभाव्य बंडखोरी रोखणे, ही मोठी कसरत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसमोर उभी राहिली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी एकाच जागेसाठी अनेक इच्छुक असल्याने पक्षांतर्गत नाराजीही उफाळून येण्याची शक्यता आहे.
मिनी मंत्रालयाचा निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरणे – 16 जानेवारी ते 21 जानेवारी
अर्जांची छाननी – 22 जानेवारी
अर्ज माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी दुपारी 3 पर्यंत
अंतिम उमेदवार यादी व चिन्हवाटप – 27 जानेवारी दुपारी 3.30 नंतर
मतदान – 5 फेब्रुवारी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत
मतमोजणी – 7 फेब्रुवारी सकाळी 10वाजल्यापासून
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











