dineshkumar aitawade 9850652056
kavte piran vishesh news : मरणालाही आधार देणारा कवठेपिरानचा वैकुंठ रथ : माणसाचा जन्म हा एका मोठ्या आनंदानं आणि गजबजाटानं होतो. घरात बाळ येतं, पाळणा हलतो, डोळे भरून येतात, देवपूजा होते, नातेवाईक गर्दी करतात.पण त्या जन्माला ज्याला आपण ‘साजरा’ करतो, त्याच जन्माला एक दिवस ‘शांत’ व्हावं लागतं. मरण — अपरिहार्य, अटळ, अखंड सत्य.
जन्म म्हणजे आशा आणि स्वप्नं, तर मरण म्हणजे विराम आणि आठवणी.
kavte piran vishesh news : मरणालाही आधार देणारा कवठेपिरानचा वैकुंठ रथ
मरणालाही दिला माणुसकीचा आणि आनंदाचा निरोप
आजच्या या वेगवान, स्वार्थी आणि विभक्त जगात मात्र मरणाला त्या माणुसकीचा, त्या आपुलकीचा आणि त्या चार खांद्याचा आधारही लाभत नाही. नाती इतकी कोरडी झालीत की, मरण पावल्यानंतर घरातील माणसंही मागं सरकतात, ‘कोण खांदा देणार?’ हा प्रश्नच घरात घुमत राहतो. कधी-कधी स्मशानभूमीही इतकी लांब असते, की मरणाच्या वेळी जिवंत माणसालाच विचार पडतो —
“हा खांदा कुणाला तरी द्यावा का?”
अशा भयाण, बोथट झालेल्या वास्तवाला कवठे पिरान या मिरज तालुक्यातल्या छोट्याशा गावानं माणुसकीची गोड झुळूक दिली आहे. इथं मरणाला केवळ एक ‘समाप्ती’ न मानता, त्याला सन्मानानं, आनंदानं निरोप दिला जातो.

होय, इथं मृत्यूचा निरोप देण्यासाठी गावानं बनवला आहे — वैकुंठ रथ.
हा रथ म्हणजे फक्त लोखंडाचे चाके, चकाकते काचं, सजावट असलेलं एक वाहन नाही. हा रथ म्हणजे गावकऱ्यांच्या माणुसकीचा, एकतेचा आणि परंपरेचा झेंडा आहे. ज्याच्या घरात मृत्यू होतो, त्या घरापर्यंत हा रथ पाच मिनिटांत पोहोचतो —
तेही कोणतीही फी न घेता, कोणताही भार न लादता. म्हणजेच मरणालाही इथं सन्मानानं वैकुंठाचा रस्ता दाखवला जातो.
आज इतरत्र मरणालाही माणूस एकटाच उरतो, चार खांदे देणारेही चार पावलांवरून मागं हटतात,
पण कवठे पिरानमध्ये त्या मृतात्म्याला रथावर बसवून गावकरी, नातेवाईक आणि मित्र त्याला खांदा देतात, साथ देतात.
म्हणून इथं मरण भयावह न वाटता, एक सुंदर आणि सन्माननीय शेवट वाटतो.
ही कल्पना गावचे आदर्श सरपंच भीमराव माने यांच्या मनात आली. त्यांनी म्हटलं, “मरण म्हणजेही एक यात्रा आहे.
ती यात्राही माणुसकीनं साजरी व्हावी.” आणि या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवलं ग्रामपंचायतचे अधिकारी अविनाश धनवडे आणि त्यांची कार्यकुशल, संवेदनशील टीमनं. गावकऱ्यांनी एकत्र येऊन, श्रमदानानं आणि सहकार्यानं हा रथ बनवला.
एकदा बनल्यावर त्याचं नित्यनेमाने देखभालही केली जाते, आणि कुणीही गरीब-श्रीमंत, मोठा-छोटा असा भेद न करता हा रथ सर्वांसाठी उपलब्ध आहे.
आज या रथामुळं गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असतं, पण त्यात दुःखाच्या पलीकडं समाधानाचं, माणुसकीचं पाणी मिसळलेलं असतं. जेव्हा हा रथ एखाद्या घरातून निघतो, तेव्हा गावकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभं राहतात, डोकं टेकवतात आणि त्या माणसाला शेवटचा निरोप देतात. गावाच्या रस्त्यावरून निघणारा हा रथ सांगतो —
“मरणाला घाबरू नका, इथं अजून माणुसकी जिवंत आहे.”
कधी काळी लोक म्हणत, “मरणाच्या वेळी सावलीही साथ देत नाही.” पण कवठे पिरानच्या या वैकुंठ रथानं हे विधान खोडून काढलं. इथं मरणालाही खांद्याला खांदा लावून साथ करणारी माणसं आहेत.
kavte-piran-vishesh-news-kavathepirans-vaikuntha-rath-which-supports-even-death
हा रथ म्हणजे गावकऱ्यांच्या माणुसकीचं मंदिर आहे. हा रथ म्हणजे काळजाला भिडणारी एक आठवण आहे.
हा रथ म्हणजे माणूसपणाला पुन्हा जागं करणारा एक दीप आहे.
कवठे पिरानच्या या उदात्त उपक्रमाला आणि माणुसकीला सलाम! ज्यांनी मृत्यूलाही मान दिला आणि माणसातल्या माणसाला पुन्हा जिवंत केलं.
तीनशे वर्षांची परंपरा लाभलेला – समडोळीचा जोगणी महोत्सव
शंभर वर्षांची साक्ष देणारी, समडोळीतील शालिनी पाटलांची विहीर
समडोळीच्या हृदयात वसलेला शिक्षणाचा राजवाडा
समडोळीच्या वग्यानी वाड्याचा राजेशाही पुन्हा जागृत…
समडोळीचा दीडशे वर्षांपूर्वीचा गंजीखाना – वैरणीतून गावसंस्कृतीची पाळंमुळे
मरणालाही समाधान वाटावे असे ठिकाण — कवठेपिरांची स्मशानभूमी
समडोळीच्या मातीतील रंगीत गुपित: फॅन-थ्रोटेड लिझर्ड
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.












